हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 16/5/2026
आष्टी येथे ‘भव्य समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप, नागरिकांच्या समस्यांचे जागीच निराकरण....
महसूल, कृषी, आरोग्य व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती;ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
तालुका प्रतिनिधी भगवान कदम
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत तहसील कार्यालय हदगाव (मंडळ आष्टी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य समाधान शिबिर आज आष्टी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या शासकीय अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांतील लाभधारकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
तसेच महसूल,आरोग्य,कृषी,पुरवठा व इतर विभागांशी संबंधित अनेक प्रलंबित समस्यांचे जागीच निराकरण करण्यात आले. विविध दाखले,महसूल विषयक अडचणी,योजना लाभ, अर्ज प्रक्रिया आदी विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला आष्टी येथील प्रथम नागरिक सरपंच सुनीता खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हदगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मुगाजी काकडे, नायब तहसीलदार अनिल तामसकर, हदगावचे गटविकास अधिकारी आडेराघो, तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे, पुरवठा विभागाचे अतिरिक्त अधिकारी राजेंद्र खंदारे भूमी अभिलेख विभागाची अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आष्टी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, आशा वर्कर, आरोग्य सेविका, ग्रामसेवक तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे ठरत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.या समाधान शिबिरामुळे अनेक नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.



