हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 12/5/2026
महापालिका जिममध्ये गंभीर अनियमितता; कुकशेत येथील व्यायामशाळा तात्काळ ताब्यात घेण्याची महादेव पवार यांची मागणी.
नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे
कुकशेत गाव, भूखंड क्र. P-11 येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यायामशाळेमध्ये गंभीर अनियमितता, करारभंग व नागरिकांकडून अवाजवी शुल्क आकारणी होत असल्याचा आरोप करत शिवसैनिक महादेव माणिकराव पवार यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
सदर व्यायामशाळा जय गजानन मित्र मंडळास भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. मात्र संबंधित संस्थेचा ५ वर्षांचा भाडेकरार ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपुष्टात आल्यानंतरही कोणताही वैध करार नसताना गेल्या ९ महिन्यांपासून व्यायामशाळेचा वापर सुरू असल्याचे पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच नवीन भाडेकरारासाठी कोणतीही जाहिरात न काढल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महानगरपालिकेची तीन मजली इमारत केवळ २१ हजार रुपयांच्या मासिक भाड्याने देण्यात आली असून प्रत्यक्षात सदस्यांकडून १६०० रुपये मासिक शुल्कासह इतर शुल्क आकारून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिसरातील खासगी जिमपेक्षा महापालिका जिमचे शुल्क अधिक असल्याने नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, करार जय गजानन मित्र मंडळाच्या नावावर असताना प्रत्यक्षात “B More Fit Gym” या नावाने जिम चालवली जात असून पावत्या देखील त्याच नावाने दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार करारातील अटींचे थेट उल्लंघन असून तृतीय पक्षाला अवैधरित्या संचालन देण्यात आल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे.
महादेव पवार यांनी सदर व्यायामशाळा तात्काळ महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन ती थेट महापालिकेमार्फत चालविण्याची मागणी केली आहे. “महानगरपालिकेकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग उपलब्ध असल्याने नागरिकांना परवडणाऱ्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिमचे संचालन थेट प्रशासनाने करावे,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित संस्था व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान वसूल करावे आणि भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी कठोर धोरण आखावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


