शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

10/5/2026

“गरिबीच्या झोपडीतून तेजाचा दिवा पेटला!”कु. प्राजक्ता सदामते हिची ९५.२०% गुणांसह दैदिप्यमान भरारी; वर्गातील अभ्यास, जिद्द आणि आई-वडिलांच्या कष्टांचे सुवर्णफळ.

सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ



आजच्या कोचिंग क्लासच्या बाजारात लाखो रुपये मोजूनही यशाची हमी मिळत नाही; पण जिद्द, चिकाटी आणि शिक्षकांवरील विश्वास असेल तर गरीबाच्या घरातील मुलगीही आकाशाला गवसणी घालू शकते, हे कु. प्राजक्ता संजय सदामते हिने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे.

घाटे गुरुजी विद्यालय, शिरढोण ता. कवठेमंकाळ येथील विद्यार्थिनी कु. प्राजक्ता हिने दहावी परीक्षेत तब्बल ९५.२० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक तर देशिंग केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावून यशाचा झेंडा रोवला आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माने सर तसेच श्री. वाघमोडे सर यांनी बुके देऊन तिचा जाहीर सत्कार केला.

विशेष म्हणजे, आज जिथे “क्लासशिवाय यश नाही” असा गैरसमज पसरवला जातो, तिथे प्राजक्ताने कोणताही खासगी क्लास न लावता केवळ शाळेतील शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास, घरी केलेली अथक मेहनत आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर हे यश संपादन केले.

ही केवळ मार्कांची कमाई नाही; तर संघर्ष, संस्कार आणि स्वाभिमानाचा विजय आहे!

प्राजक्ताची आई शुभांगी या गृहिणी असून वडील संजय सदामते हे प्लंबिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही “मुलगी शिकली पाहिजे” हा ध्यास त्यांनी सोडला नाही. मिळेल ते काम करून, प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी झटण्याचे काम केले. त्या कष्टाची परतफेड प्राजक्ताने आपल्या गुणवत्तेने केली आहे.

आज समाजात पैशांच्या बळावर यश विकत घेण्याची स्पर्धा सुरू असताना, एका गरीब कुटुंबातील मुलीने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक श्रीमंतांच्या दिखाव्यालाही लाजवणारे आहे.

“विद्येचा ध्यास, व्यासंग वृत्ती आणि आई-वडिलांचे संस्कार” यांची जोड मिळाली तर गरिबीही पराभूत होते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कु. प्राजक्ता सदामते!

तिच्या या यशामुळे संपूर्ण शिरढोण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, अनेक विद्यार्थ्यांसमोर तिने प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top