हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 10/5/2026
चाणजे ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरला : पावसाळापूर्व सफाई न केल्याने डेंगूने 3 जण बाधित, एका महिलेचा मृत्यू; पंचायत समिती सदस्य कैलास भोईर यांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष.
पत्रकार / पूजा चव्हाण.
चाणजे-उरण, दि. 10 : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीत पावसाळापूर्व नालेसफाई व कचरा उचलण्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने डेंगूची साथ पसरली आहे. डाऊर नगर येथे आतापर्यंत 3 जणांना डेंगूची लागण झाली असून त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पंचायत समिती सदस्य कैलास भोईर यांनी वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने सफाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच चाणजे ग्रामपंचायत परिसरातील मोठे नाले व उघड्या जागा कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल, कापड व सडलेल्या कचऱ्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही ग्रामपंचायतीने नालेसफाई, औषध फवारणी किंवा गटारे स्वच्छ करण्याची मोहीम अध्याप हाती घेतली नाही. परिणामी गेल्या 15 दिवसांत गावात डेंगूचे 3 रुग्ण आढळले. यातील एका 22 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य 4 जणांवर खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंचायत समिती सदस्य यांच्या तक्रारीला केराची टोपली.
पंचायत समिती सदस्य कैलास भोईर यांनी सांगितले, “गेल्या दोन महिन्यांपासून मी ग्रामसेवकांकडे पावसाळापूर्व स्वच्छतेबाबत लेखी तक्रारी देऊन सुद्धा . चाणजे ग्रामपंचायत हद्दीत नाले, गटारे तुंबली आहेत, कचरा साचला आहे, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यापूर्वी सफाई करा, औषध फवारणी करा, असे वारंवार सांगितले. पण ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्याच परिणाम म्हणून आज डाऊर नगर येथे डेंगू पसरला आणि एका महिलेला जीव गमवावा लागला.” अशीच साफ सफाई व औषध फवारणी वेळेस केली नाही तरी पूर्ण परिसरात डेंगू सारखा आजार पसरण्याची शक्यता नाकारत येऊ शकत नाही व याची जबाबदारी पूर्ण चाणजे ग्रामपंचायत यांची राहील.
आरोग्य विभागाचे नियम काय सांगतात?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार गावातील सार्वजनिक स्वच्छता, नाले-गटारांची सफाई, साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले-गटारे स्वच्छ करणे, अळीनाशक फवारणी करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास साथीचे आजार पसरण्यास ग्रामपंचायत थेट जबाबदार धरली जाऊ शकते.
नागरिकांत संताप, कारवाईची मागणी.
“आमच्या घराशेजारीच नाला तुंबला आहे. कचऱ्याचे ढीग लागलेत. दुर्गंधी सुटली आहे. लहान मुले आजारी पडत आहेत. एका महिलेचा बळी गेला तरी प्रशासनाला जाग येत नाही. याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
नागरिकांनी मागणी केली आहे की, 1) तात्काळ संपूर्ण गावात नालेसफाई व कचरा उचलण्याची मोहीम राबवावी. 2) प्रत्येक घरात व सार्वजनिक ठिकाणी डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी करावी. 3) डेंगू बाधित रुग्णांवर मोफत उपचार करावेत व मृत महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी. 4) हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेने शिस्तभंगाची कारवाई करावी.
उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून चाणजे गावात स्वच्छता मोहीम राबवावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा डेंगूची साथ आणखी बळावण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



