वेश्वीतील गोदामाची आग : नियमांवर प्रश्नचिन्ह, प्रशासन झोपले आहे का?

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 16/11/2026

वेश्वीतील गोदामाची आग : नियमांवर प्रश्नचिन्ह, प्रशासन झोपले आहे का?


पत्रकार - पुजा चव्हाण 

वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटीनम लॉजिस्टिक गोदामाला सोमवारी सकाळी १०.३० वाजता लागलेल्या भीषण आगीने उरण तालुक्यातील गोदामांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केमिकलच्या साठ्यामुळे झालेल्या स्फोटांनी परिसर हादरला, तर काळ्या धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला.


आगीची माहिती मिळताच सिडको, पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोदामातील माल पूर्णपणे जळून खाक झाला.


नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रहिवासी वस्तीजवळ अशा प्रकारे केमिकल साठवणूक असलेल्या गोदामांना परवानगी कशी दिली जाते? या गोदामांचे फायर ऑडिट वेळेवर होते का? यासारखे प्रश्न सध्या गावात चर्चेत आहेत.


तसेच, रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण आल्याचे नागरिकांनी सांगितले. वेळेवर मदत पोहोचणे गरजेचे असताना ही कोंडी का होते, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.


प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी

घटनास्थळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी उरण पोलीस तपास करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.


उरण तालुक्यात अनेक ठिकाणी गोदामे आणि कंटेनर यार्ड उभी राहिली आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधित विभागाने सर्व गोदामांची तपासणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, हे तपासावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. आता प्रशासन यावर काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top