हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 23/8/2026
नवी मुंबईत "नशा मुक्त नवी मुंबई" अभियानाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "कॅम्पस कनेक्ट" चा शुभारंभ.
पत्रकार / पूजा चव्हाण.
नवी मुंबई | 22 ऑगस्ट - नवी मुंबई पोलीस दलाने विद्यार्थी आणि तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी सुरू केलेल्या "नशा मुक्त नवी मुंबई अभियान 2026" अंतर्गत "कॅम्पस कनेक्ट" या विशेष उपक्रमाचा भव्य शुभारंभ काल शनिवार दि. 22 ऑगस्ट रोजी करण्यात आला.
डी. वाय. पाटील कॉलेज, नवी मुंबई येथे सकाळी 10.30 वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, उरणचे आमदार महेश बालदी, विविध शाळा-कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्य सरकारने अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबली आहे. आजकाल इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरूनही अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबईत देशातील अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार आहे. तरुणाईला व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलीस आणि शिक्षण संस्थांनी एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून कॅम्पस कनेक्ट हा उपक्रम सुरू करण्यात आला असून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ व व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती निर्माण करून नशामुक्त, सुरक्षित आणि सक्षम युवा पिढी घडवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानात विद्यार्थ्यांसाठी रील मेकिंग आणि पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत उरणमधील प्रत्येक शाळेत जाऊन प्रोजेक्टरवर जनजागृतीपर पोस्टर दाखवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून यामध्ये एनएडी केंद्रीय विद्यालयासह उरणमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश होता.


