हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 4/7/2026
जागतिक शांततेसाठी ISCTH चे आवाहन; संवादातून संघर्ष संपविण्याचा आग्रह.
नवी मुंबई, (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) : सध्याच्या जागतिक परिस्थितीत वाढते सशस्त्र संघर्ष, राजकीय स्पर्धा आणि वैचारिक मतभेद यामुळे संपूर्ण मानवजातीसमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल स्पिरिच्युअल कौन्सिल फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमॅनिटी (ISCTH) या जागतिक संस्थेने जगातील राष्ट्रप्रमुख, धोरणकर्ते आणि मानवतावाद्यांना संवादाच्या माध्यमातून शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिरस्थायी शांततेचा मार्ग हा युद्ध किंवा शक्तीप्रदर्शनातून नव्हे, तर संवाद, करुणा, परस्पर समज आणि सामूहिक जबाबदारीतून जातो. आज घेतले जाणारे निर्णय हे भविष्यातील पिढ्यांचे भविष्य निश्चित करणारे ठरणार असल्याने संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
या आवाहनाला बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको, स्विस संसदेचे सदस्य डॉ. एच. सी. निक गुगर, FOREF Europe चे अध्यक्ष जान फिगेल, UN OCHA (UAE) च्या प्रमुख सजेदा शावा, परमपूज्य दलाई लामा तसेच व्हॅटिकनचे राज्य सचिव कार्डिनल पिएत्रो पारोलिन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या सर्व मान्यवरांनी मानवी प्रतिष्ठा, अहिंसा, संवाद आणि करुणा या मूल्यांवर आधारित जागतिक शांततेची गरज अधोरेखित केली.
ISCTH चे प्रेरणास्त्रोत मैत्रेय दादाश्रीजी यांनी युद्धाचे परिणाम मानवजातीबरोबरच पृथ्वीच्या अस्तित्वासाठीही घातक ठरतील, असा इशारा देत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. "आपण पृथ्वीचे मालक नसून तिचे संरक्षक आहोत. त्यामुळे तिचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे," असे त्यांनी नमूद केले.
मानवी जीवनाचे संरक्षण, प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा सन्मान आणि पृथ्वीच्या भविष्याला सर्वोच्च प्राधान्य देत जागतिक शांततेसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन ISCTH ने केले आहे.


