अंबा नदीत सापडला परदेशी 'अल्बिनो एलीगेटर गार'! निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहून वावे गावात आश्चर्य.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 12/7/2026

अंबा नदीत सापडला परदेशी 'अल्बिनो एलीगेटर गार'! निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहून वावे गावात आश्चर्य.


पत्रकार / पूजा चव्हाण 

पाली, 12 जुलै 2026: रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वावे गावातून वाहणाऱ्या अंबा नदीत एक अत्यंत दुर्मिळ आणि परदेशी प्रजातीचा मासा आढळून आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. चमकदार पिवळ्या आणि नारंगी रंगाचा हा मासा 'अल्बिनो एलीगेटर गार' या नावाने ओळखला जातो. 



शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी सकाळी वावे येथील स्थानिक तरुण कैलास हिलम आणि केतन म्हसके हे नेहमीप्रमाणे नदीकाठावर फिरायला गेले असता त्यांना नदीपात्रात हा वेगळ्या रंगाचा मासा मृत अवस्थेत आढळला. नदीत असा अनोखा जीव पाहून क्षणात ही बातमी गावभर पसरली आणि हा दुर्मिळ मासा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.



वन्यजीव अभ्यासक सागर दहिंबेकर यांच्या म्हणण्यानुसार एलीगेटर गार ही मूळची अमेरिका खंडातील गोड्या पाण्यातील माशाची प्रजाती आहे. या माशांची ओळख म्हणजे त्यांचे लांबट टोकदार तोंड आणि मगरीसारखा दिसणारा जबडा. साधारणतः निसर्गात या माशाचा रंग गडद हिरवा किंवा राखाडी असतो. परंतु जनुकीय बदलामुळे शरीरातील नैसर्गिक रंगद्रव्ये तयार न झाल्याने या माशाला चमकदार पिवळा-नारंगी रंग प्राप्त झाला आहे. यालाच अल्बिनो अवस्था म्हणतात. 


हा मासा भारतातील स्थानिक प्रजाती नसल्याने तो अंबा नदीत कसा आला याबत विविध तर्क लावले जात आहेत. अलीकडच्या पावसात एखाद्या मत्स्यालयातून किंवा खासगी तलावातून हा पाण्याबरोबर वाहून आला असावा किंवा एखाद्याने पाळीव म्हणून आणून नंतर नदीत सोडला असावा, असे दहिंबेकर यांनी सांगितले.


रायगड जिल्ह्यात अशा दुर्मिळ अल्बिनो अवस्थेतील जीव आढळण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी माणगाव शहरात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान जमिनीबाहेर पडलेला पांढऱ्याशुभ्र रंगाचा अत्यंत दुर्मिळ 'अल्बिनो चंचु वाळा' हा बिनविषारी साप आढळून आला होता. निसर्गाचा हा अनोखा नमुना पाहण्यासाठी आज दिवसभर वावे परिसरातील नागरिकांनी अंबा नदीकाठी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top