हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 29/6/2026
उरणच्या खाडीत कांदळवनात रुतलेला अनोळखी मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढला; सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडथळे.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, : उरण रेल्वे स्टेशन समोरील कांठल्या नावाच्या खाडीतील कांदळवनात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाला रविवार दुपारी एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह अडकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उरण पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दि. २८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता संयोग प्रभाकर चव्हाण. राहणार करंजा हे खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांना कांदळवनाच्या झाडांमध्ये व चिखलात एक पुरुषाचा मृतदेह अडकलेल्या स्थितीत दिसला. त्यांनी तातडीने उरण पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय वसंत साबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र मृतदेह कांदळवनाच्या दाट झाडांमध्ये व चिखलात रुतल्याने बाहेर काढणे शक्य होत नव्हते. झाडे कापण्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने तातडीने सिडको अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सिडको अग्निशमन दलाने घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी कटरच्या साहाय्याने कांदळवनाची झाडे कापली आणि चिखलात रुतलेला मृतदेह बाहेर काढून रस्त्यावर आणला. त्यानंतर रुग्णवाहिकेने मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे नेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी दुपारी २.१५ वाजता तपासणी करून त्यास दाखलपूर्व मयत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, उंची सव्वा पाच फूट, शरीर कुजलेल्या स्थितीत होते. त्याच्या उजव्या हाताला सहा बोटे आहेत. अंगात निळसर रंगाचा नक्षीदार शर्ट आणि निळसर रंगाची जीन्स पॅन्ट होती. धर्माने मुस्लीम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृताचा वर्तमान व कायमचा पत्ता माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात यु.डी. क्र. ००५१/२०२६ अन्वये अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे करीत असून उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनिफ दस्तगीर मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होईल. दरम्यान, उरण परिसरात वारंवार अनोळखी मृतदेह आढळून येत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. उरण आता ‘बॉडी लपवायचे किंवा टाकायचे डंपिंग ग्राउंड’ बनले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास पुढे लागत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरी ते बंद अवस्थेत आहेत. हे कॅमेरे तातडीने सुरू करावेत, जेणेकरून अशा घटनांचा तात्काळ शोध लागेल आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा त्यांचे नातेवाईक कोणाच्या ओळखीचे असल्यास त्यांनी तात्काळ उरण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.




