यळगूडमधील बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकरण तापले; डॉक्टर पिता-पुत्रांवर फौजदारीची मागणी, ग्रामपंचायत सदस्यांवरच ‘झाडे गायब’ करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :-24/6/2026

यळगूडमधील बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रकरण तापले; डॉक्टर पिता-पुत्रांवर फौजदारीची मागणी, ग्रामपंचायत सदस्यांवरच ‘झाडे गायब’ करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप.



यळगूड, (वार्ताहर) : यळगूड परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. हुपरी येथील डॉक्टर पिता-पुत्रांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी तक्रारदार व नागरिकांमधून होत आहे. वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असला तरी यळगूड ग्रामपंचायतीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणातील अनेक गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.  


मिळालेल्या माहितीनुसार या वृक्षतोड प्रकरणात संशयितांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. कारवाईची कुणकुण लागताच तोडलेली मोठमोठी झाडे घटनास्थळावरून हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकरणातील संशय अधिकच बळावला आहे. वृक्षतोडीत सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. वृक्षतोड करण्यासाठी कटर मशीन, जेसीबी आणि इतर वाहनांचा वापर झाल्याची चर्चा गावात आहे. अशा परिस्थितीत ही सर्व यंत्रसामग्री व वाहने जप्त करून चौकशी करणे गरजेचे असताना, अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.  


केवळ आर्थिक दंड आकारून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रकरणात ‘मांडवली’ झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पर्यावरणाची मोठी हानी करणाऱ्या अशा घटनांमध्ये फक्त दंड पुरेसा नाही. वनसंपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.  


दरम्यान, या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. संशयित डॉक्टर पिता-पुत्र व त्यांचे सहकारी गावातील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तोडलेली झाडे गायब करण्याचा सल्ला काही ग्रामपंचायत सदस्यांनीच दिला, अशी कुजबुज गावात सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत सदस्य आरोपींच्या बाजूने असल्याचा आरोप होत आहे.  


या बेकायदेशीर वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई व्हावी, या मागणीसाठी लोकसेवा महासंघ या सामाजिक संघटनेने ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वन विभाग व प्रशासन आता कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top