हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 18/6/2026
"शाळा दत्तक योजनेतून वाहतूक शिस्तीचा संस्कार: न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी सोनारी जि.प. शाळेत साधला विद्यार्थ्यांशी संवाद"
(हिंदुसम्राट उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण याजकडून )
*उरण, दि. 18 जून 2026*
श्री. राहुल खाडे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘शाळा दत्तक योजना 2026-2027’ अंतर्गत न्हावाशेवा वाहतूक शाखेने आज रा.जि.प. शाळा, सोनारी येथे वाहतूक प्रबोधन कार्यक्रम राबवला. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये लहान वयातच वाहतूक नियमांची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नवी मुंबई वाहतूक आयुक्तालयाने हद्दीतील सर्व शाळांना वाहतूक नियमांचे प्रबोधन करण्यासाठी ‘शाळा दत्तक योजना’ सुरू केली असून न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या हद्दीत एकूण 16 शाळा आहेत. प्रत्येक शाळा एका अंमलदाराला दत्तक देण्यात आली असून नेमलेले अंमलदार नियमितपणे शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत.
या उपक्रमाअंतर्गत आज दि. 18 जून 2026 रोजी न्हावाशेवा वाहतूक शाखेतील पोहवा/2322 किरण तुळशीदास म्हात्रे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. शाळा, सोनारी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, सिग्नलचे नियम, हेल्मेट व सीटबेल्टची आवश्यकता, तसेच सायकल व पादचारी सुरक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पोहवा किरण म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, वाहतूक नियमांबाबत काही अडचण किंवा सूचना असल्यास बिनधास्तपणे सांगा, कारण तुम्हीच उद्याचे जबाबदार नागरिक आहात. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर प्रबोधन कार्यक्रमास रा. जि.प. शाळा सोनारीचे प्राचार्य श्री. कल्याण कोळी सर, शिक्षिका सौ. मनिषा दिलीप सावंत व सौ. निलिमा महेश म्हात्रे, तसेच पोलीस अंमलदार पोहवा/2322 किरण म्हात्रे, चापोशि/5248 देवेंद्र दिवेकर आणि 35 ते 40 विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. नवी मुंबई वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लहान वयातच वाहतूक शिस्त अंगी बाणली तर भविष्यातील अपघातांचे प्रमाण निश्चित कमी होईल. ‘शाळा दत्तक योजना’ ही केवळ नियमांची माहिती देण्यासाठी नसून, विद्यार्थ्यांमधूनच वाहतूक दूत घडवण्याचा प्रयत्न आहे. हे विद्यार्थी आपल्या कुटुंबाला व समाजालाही नियम पाळण्यास प्रेरित करतील.
न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या हद्दीतील उर्वरित 15 शाळांमध्येही टप्प्याटप्प्याने असे प्रबोधन कार्यक्रम राबवले जाणार असून प्रत्येक दत्तक अंमलदार महिन्यातून किमान एकदा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणार आहे. ‘सुरक्षित रस्ता, सुरक्षित जीवन’ या घोषवाक्यासह नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम रायगड जिल्ह्यातील शाळांसाठी पथदर्शी ठरणार आहे.


