"बोरीतील दुचाकी अपघातामागील सत्य काय? अफवांना पेव, नगरसेवकांची पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी"

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 8/6/2026

"बोरीतील दुचाकी अपघातामागील सत्य काय? अफवांना पेव, नगरसेवकांची पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी"


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, 7 जून 2026 - उरण-मोरा रस्त्यावर बोरी येथील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर दि. 01 जून 2026 रोजी पहाटे 2:00 ते 3:00 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण दुचाकी अपघाताने संपूर्ण उरण तालुका हादरला आहे. या दुर्दैवी अपघातात कै. निखील कुकडे आणि कै. महेश चांदेकर या दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



अपघाताबाबत जनमानसात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही नागरिकांच्या मते दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली, तर काहींच्या मते दोन्ही दुचाकी एकाच दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात मोठ्या वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडला. एवढेच नाही तर हा घातपात असल्याचीही चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. या अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन उरण नगरपरिषदेने या प्रकरणात तातडीने लक्ष घातले आहे.


या संभ्रमाच्या वातावरणाची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांनी दि. 05 जून 2026 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस स्टेशन यांना अधिकृत पत्रक दिले आहे. नगराध्यक्षांसह श्री. गणेश भास्कर शिंदे, गटनेते श्री. अतुल सुरेश ठाकूर, सौ. प्रमिला संतोष पवार, श्री. अमित हरीचंद्र म्हात्रे, श्रीमती वंदना विजय पवार, नाहिदा इरफान ठाकूर, सौ. प्रार्थना चेतन म्हात्रे, सौ. तनिषा सागर पाटील, श्री. विक्रम राजेंद्र म्हात्रे आणि श्री. मंगेश लक्ष्मण कासारे अशा एकूण 10 नगरसेवकांच्या सह्या असलेल्या या पत्रातून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. बोरी-मोरा रस्त्यावरील व परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर तांत्रिक पुरावे तातडीने तपासून अपघाताचे नेमके कारण शोधावे आणि तपासाअंती या अपघाताची सत्य व वस्तुस्थिती जनतेसमोर अधिकृतपणे जाहीर करून जनमानसातील संभ्रम व अफवा दूर कराव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. या पत्राच्या प्रती माहितीसाठी व योग्य कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, पनवेल विभाग यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.


सध्या उरण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे लवकरच अपघाताचे खरे कारण समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top