हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 7/6/2026
"उरणचा विकास: सिमेंटचे रस्ते आले, पण जीव वाचवायला हॉस्पिटल नाही; इंजिनिअर-डॉक्टर घडवायला कॉलेज नाही!"
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, 7 जून 2026 - अहो उरणकरांनो, अभिनंदन! आपण आता अधिकृत "नवी मुंबईकर" झालोय. बिल्डरांच्या जाहिरातीत तरी मोठ्या अक्षरात तसं लिहिलेलं असतं. JNPT आलं, SEZ आला, कंटेनरचे डोंगर आले, धूळ आली, ट्रॅफिक आला, अपघात आले. विकासाची गाडी सुसाट सुटली. पण गाडी सुसाट सुटली तरी ब्रेक लावायला जागाच नाही, कारण एक धड हॉस्पिटलच आलेलं नाही. आणि हॉस्पिटलमध्ये काम करायला किंवा हे रस्ते बांधायला लागणारे इंजिनिअर-डॉक्टर घडवायला एक चांगलं कॉलेज पण नाही.
पूर्वी उरण म्हणजे शांत गाव. नारळी-पोफळीच्या बागा, कमी माणसं, तुरळक गाड्या. मग विकास आला. चार पदरी, सहा पदरी रस्ते झाले. JNPT मुळे दिवसाला हजारो कंटेनर धावू लागले. उद्योग आले, नोकऱ्या आल्या, बाहेरची पब्लिक आली. आणि अपघात पण डबल स्पीडने वाढले. रस्ता बांधणाऱ्याला माहित होतं की अपघात होणार, म्हणूनच जागोजागी "अपघात प्रवण क्षेत्र" चे बोर्ड लावले. पण बोर्ड लावून त्यांची ड्यूटी संपली. अपघात झाला की माणसाला न्यायचं कुठे? तर "नवी मुंबईला घेऊन जा" किंवा "पनवेलला पळवा" हाच एक मंत्र. उरणचा पेशंट अर्ध्या रस्त्यातच देवाघरी जायचा, पण हॉस्पिटल मात्र उरणात यायला तयार नाही.
आता गंमत बघा, उरणची मुलं हुशार नाहीत असं नाही. इथली पोरं रात्र-रात्र जागून अभ्यास करून MBBS करतात, इंजिनिअर होतात. गावासाठी काहीतरी करायची इच्छा पण असते. पण करणार कुठे? उरणमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल नाही की एक चांगलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज नाही. मग ते बिचारे मुंबई-पुण्यात जाऊन दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात, दुसऱ्याच्या कंपनीत राबतात. आपला डॉक्टर दुसऱ्याच्या पेशंटची सेवा करतो आणि आपला पेशंट रस्त्यात तडफडून मरतो. आपला इंजिनिअर दुसऱ्याचे पूल बांधतो आणि आपण इथे खड्ड्यात पडतो. याला म्हणतात विकास! JNPT मुळे सरकारला हजारो कोटींचा महसूल मिळतो, पण त्या पैशातून एक 100 बेडचं हॉस्पिटल किंवा एक कॉलेज बांधायला बजेट नाही. ट्रॉमा सेंटर तर लांबची गोष्ट, साधा CT स्कॅन करायचा असेल तरी पनवेल गाठावं लागतं.
हा सगळा विषय निघतो कधी? तर निवडणूक आली की. मग सगळे नेते स्टेजवर येऊन गळा काढतात. "उरणला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणणार", "मेडिकल कॉलेज मंजूर करणार", "इंजिनिअरिंग कॉलेजसाठी जागा फायनल झाली", "अपघातात एकही जीव जाऊ देणार नाही". जनतेला वाटतं चला, आता तरी नशीब उघडलं. पण निवडणूक झाली की नेत्यांना "मेमरी लॉस" होतो. हॉस्पिटलचा "H" आणि कॉलेजचा "C" पण आठवत नाही. पाच वर्षांनी परत तेच भाषण, तीच आश्वासनं. फक्त ऐकणारी जनता आणि मरणारे पेशंट बदलतात, नेत्यांची स्क्रिप्ट तीच राहते. प्रशासनाच्या फाईली तर अशा ठिकाणी अडकल्यात की त्यांना बाहेर काढायला JCB लागेल. DP प्लॅनमध्ये हॉस्पिटल आणि कॉलेजसाठी जागा राखीव आहे म्हणतात, पण त्या जागेवर एवढं गवत उगवलंय की कदाचित तिथेच "गवत संशोधन केंद्र" काढायचा प्लॅन असेल.
आता उरणकरांनो एकच उपाय. अपघात झाला की 108 ला फोन करायच्या आधी आमदार-खासदाराला फोन करा. म्हणजे पेशंटपेक्षा आधी नेत्याला जाग येईल. आणि मुलांना शिकवायचं असेल तर घरातच शिकवा, कारण कॉलेजची वाट बघाल तर पोरं म्हातारी होतील. नाहीतर सगळ्या रस्त्यांवर एक बोर्ड लावा - "येथे अपघात करू नये आणि आजारी पडू नये". कारण उपचाराला हॉस्पिटल नाही आणि शिकायला कॉलेज नाही. विकास म्हणजे फक्त सिमेंटचे रस्ते आणि कंटेनरचे डोंगर नसतात. माणसाचा जीव वाचवणारं हॉस्पिटल आणि डोकं घडवणारं कॉलेज पण लागतं. पण हे समजायला कदाचित नेत्यांना स्वतःला 108 मधून किंवा ॲडमिशनसाठी लाईनीत उभं राहायची वेळ यावी लागेल. तोपर्यंत "नवी मुंबईकर" असल्याचा अभिमान बाळगा आणि प्रार्थना करा की नशीब बलवत्तर असावं. कारण इथे विकास "बुलेट ट्रेन" च्या स्पीडने झाला, पण हॉस्पिटल आणि कॉलेज मात्र अजूनही "बैलगाडी" मध्ये अडकलेत.


