शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 4/6/2026

"उरणच्या बोरीत 'अंधारयुग' अवतरले; एक कर्मचारी निवृत्त झाला, अख्खा परिसर 'स्विच ऑफ'! प्रशासनाच्या 'लाईट बिलावर' जनता बेहाल, साप-विंचूंची 'नाईट पार्टी' सुरू"








पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, रायगड  - उरण नगर परिषदेच्या हद्दीतील बोरी परिसर सध्या 'काळोखाच्या साम्राज्यात' ढकलला गेला आहे. कारण काय, तर पथदिवे सुरू करणारा कर्मचारी सुनील कुंभार सेवानिवृत्त झाला! एक माणूस निवृत्त झाला आणि अख्खा बोरी परिसर दोन दिवसांपासून 'अंधाराच्या गुहेत' गेला, असा भन्नाट प्रकार उरण नगर परिषदेत घडला आहे. याबाबत नगरसेविका प्रमिला संतोष पवार यांनी 3 जून 2026 रोजी नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित प्रशासनाला चांगलेच खडसावले आहे.



प्रमिला पवार यांच्या पत्रानुसार, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून बोरीचा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. रात्रीच्या वेळी साप, विंचू यांसारखे सरपटणारे विषारी प्राणी रस्त्यावर येण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच रानडुकरांचा वावरही वाढला आहे. म्हणजे बोरीकरांच्या नशिबी आता 'लाईट गेली' नाही, तर 'लाईट लावणाराच गेला' अशी अवस्था आली आहे. नागरिक जीव मुठीत धरून जगतायत, आणि संबंधित प्रशासन मात्र 'आमच्याकडे स्विचच नाही' या थाटात आहे. 



'एक कर्मचारी निवृत्त झाला म्हणून पथदिवे सुरू करण्यास विलंब होणे हे कारण संयुक्तिक नाही' असा टोला पवार यांनी पत्रातून लगावला आहे. अहो, नगर परिषद म्हणजे एखाद्या पान टपरीसारखी झाली आहे का? 'मालक बाहेर गेला, दुकान बंद'! लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी, अभियंते, ठेकेदार, यंत्रणा सगळे काय फक्त 'निवृत्ती समारंभ' साजरा करायला बसलेत का? एका माणसावर अख्ख्या परिसराच्या पथदिव्यांचा भार होता, तर मग 'बॅकअप प्लॅन' नावाचा प्रकार उरण नगर परिषदेच्या शब्दकोशातच नाही का? उद्या मुख्याधिकारी साहेब सुट्टीवर गेले तर नगर परिषदलाच 'टाळं' लागेल का?


पथदिव्यांअभावी अंधारात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशारा पवार यांनी दिला आहे. म्हणजे 'अंधारात काही झालं तर आम्ही जबाबदार नाही' असं बोर्ड लावून प्रशासन मोकळं होणार आहे का? नागरिक कर भरतात तो काय 'कंदिल विकत घ्यायला' भरतात का? पावसाळ्यात अंधारातून वाट काढताना जर एखाद्या नागरिकाला साप चावला, किंवा अपघात झाला, तर त्याच्या 'लाईफचा स्विच' ऑफ झाला तर त्याला जबाबदार कोण? 

संबंधित प्रशासनाला विनंती आहे की, 'निवृत्तीचा शॉक' बाजूला ठेवून तातडीने बोरी परिसरातील पथदिवे सुरू करा. कर्मचारी निवृत्त झाला, पण तुमची 'अक्कल' तर निवृत्त झाली नाही ना? एका बटणाने अख्खा परिसर उजळतो, त्या बटणापर्यंत पोहोचायला प्रशासनाला दोन दिवस लागतात, हा 'डिजिटल इंडिया'ला काळिमा फासणारा प्रकार आहे. आता तरी 'लाईट लावा', नाहीतर जनता 'लाईट घालवून' तुमच्या खुर्चीचाच स्विच ऑफ करेल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top