हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 4/6/2026
"फक्त दौरे आणि दर्शन, कामाचा मात्र विसर! : रोहित पवारांच्या करंजा दौऱ्यातून सरकारच्या नाकर्तेपणावर बोट, 'पावसाळी अधिवेशनात हिशोब घेऊ' असा इशारा".
पत्रकार / पूजा चव्हाण
उरण, रायगड, 4 जून 2026 : "प्रश्न तेच आहेत, वर्षानुवर्षे तेच आहेत. बदललं काय तर फक्त आश्वासन देणारे चेहरे," अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी करंजा दौऱ्यात सरकारच्या कामगिरीवर जोरदार हल्लाबोल केला. द्रोणागिरी मातेचे दर्शन घेऊन सुरू झालेला हा दौरा मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या व्यथांचा पाढा ऐकण्यातच गेला. करंजा-रेवस पुलापासून ते डिझेल कोट्यापर्यंत एकही प्रश्न असा नाही ज्यावर सरकारने ठोस कृती केली आहे, याचीच जाणीव या दौऱ्यातून झाली.
द्रोणागिरी मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून वर्ष झाले, पण सुशोभीकरणाचा निधी अजून फाईलीतच अडकला आहे. "देवी नवसाला पावते, पण सरकारच्या फाईली कधी हालणार?" असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. आमदार पवारांनी मंदिर परिसराची पाहणी केली, पण स्थानिकांचा एकच सूर होता की दर्शनासोबत आमच्या अडचणींचेही दर्शन घ्या. फक्त फोटोपुरते दौरे नकोत.
करंजा मच्छीमार सोसायटीत तर सरकारविरोधात संतापाचा स्फोटच झाला. डिझेल कोटा मिळत नाही, परतावा येत नाही, बंदरात मूलभूत सुविधाच नाहीत. सरकारने गाजावाजा करत मच्छीमारांना शेतकरी दर्जा दिला, पण त्याचा उपयोग काय? कर्जमाफी नाही, अनुदान नाही, विम्याचे संरक्षण नाही. "फक्त नाव दिलं, पण पदरात धोंडा टाकला," अशी खरमरीत प्रतिक्रिया एका वयोवृद्ध मच्छीमाराने दिली. आमदार पवार म्हणाले की कागदावर शेतकरी करून शेती पिकत नसते, त्यासाठी जमिनीवर काम करावं लागतं.
नव्याने सुरू असलेल्या करंजा-रेवस पुलाची बोटीतून पाहणी करताना बाधित मच्छीमार व शेतकऱ्यांचा आक्रोश समोर आला. पुलामुळे पारंपरिक मासेमारी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे, पण नुकसान भरपाईचे गाजर अजूनही दाखवलं जातंय. "सरकारला फक्त सिमेंटचे पूल बांधायचे आहेत, पण इथल्या माणसांच्या संसाराचा पूल ढासळतोय त्याचं काय?" हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. "पाहणी झाली, आता अधिवेशनात पाहतो," असा थेट इशारा पवारांनी यावेळी दिला.
सर्व व्यथा ऐकून घेतल्यावर आमदार रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याची घोषणा केली. करंजा पोर्टचा रखडलेला प्रश्न, मच्छीमारांचे डिझेल, गावठाण विस्तार, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक आणि पुलामुळे होणारे नुकसान, हे सगळे मुद्दे सभागृहात मांडून सरकारला धारेवर धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, याचवेळी उपस्थितांमधून दबक्या आवाजात चर्चा होती की अधिवेशनात सरकार सापडलं तर ना? अर्धे मंत्री बाहेर दौऱ्यावर आणि अर्धे नारळ फोडण्यात व्यस्त असतात.
नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी आयोजित केलेल्या या दौऱ्यात सिताराम नाखवा, मार्तंड नाखवा, के. एल. कोळी, रमेश भगत, सचिन डाऊर, काँग्रेस नेते भालचंद्र घरत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एकंदरीत, दौरा झाला, पाहणी झाली, आश्वासनं मिळाली, पण हे चित्र नवं नाही. गेली अनेक वर्षे करंजाकर हेच ऐकत आहेत. आता फरक इतकाच की, यावेळी विरोधी पक्षाने थेट सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलंय. पावसाळी अधिवेशनात या प्रश्नांची सरबत्ती होते की पुन्हा पावसात सगळं वाहून जातं, याकडे संपूर्ण उरण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत करंजाकरांचा सवाल एकच आहे, "साहेब, येताना फक्त आश्वासनं नको, ठोस निर्णय घेऊन या."




