हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 4/5/2026
"उरणात महागाईविरोधात 'रणचंडी' अवतरल्या; 'चुलीवरची भाकरी महागली, आता सत्तेची खुर्ची हलवू' म्हणत महिलांचा हुंकार, तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या!"
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण - "महागाईने संसाराची वाताहत झाली, गॅसचा भडका उडाला, पण सरकार मात्र एसीत बसून आहे," असा संताप व्यक्त करत उरणमधील रणरागिणींनी आज 4 जून 2026 रोजी महागाईविरोधात थेट रस्त्यावर उतरून सरकारला आव्हान दिले. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस, दुध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असून, या ज्वलंत प्रश्नावर महाविकास आघाडीने उरण तहसीलदार कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले व निवेदन सादर केले.
रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर गजानन भोईर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले ते महिलांचा प्रचंड सहभाग. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो महिलांनी 'महागाई हटवा, सरकार वाचवा' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. "चुलीवरची भाकरी महागली, मुलांचे शिक्षण महागले, दवाखाना महागला... आता जगायचं कसं?" असा सवाल करत महिलांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर आगपाखड केली.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, "गेल्या काही महिन्यांपासून महागाईने सर्वसामान्यांचा श्वास कोंडला आहे. शेतकरी, महिला, तरुण आज न्यायासाठी डोळ्यात पाणी घेऊन सरकारकडे पाहत आहेत, पण सरकार मात्र सुस्त आहे. आपल्या हक्कासाठी, भविष्यासाठी आणि या अन्यायाविरोधात आम्हाला आता शांत बसून चालणार नाही. ही लढाई कुठल्याही पक्षाची नाही, तर प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या अस्तित्वाची आहे."
या आंदोलनात वंदना पवार, नाहिदा ठाकूर, भावना म्हात्रे, प्रार्थना म्हात्रे, ममता पाटील, प्रीतम म्हात्रे, विणा लांबरेआ, मेधा मेस्त्री, प्रेरणा पाटील, कविता पाटील, प्रियदर्शनी म्हात्रे, मुमताज भाटकर, यशश्री म्हात्रे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय माजी आमदार मनोहरशेठ भोईर, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, रवि घरत, नितेश पाटील, गणेश शिंदे, विनोद म्हात्रे आदी शिवसेना, शेकाप, काँग्रेस व पंचायत समिती सभापती महेश म्हात्रे राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
"पेट्रोल 120 पार, गॅस 1100 पार, कांदा-बटाटा सोन्याच्या भावात... सरकार म्हणतं 'अच्छे दिन'? कुठे आहेत ते 'अच्छे दिन'? सामान्य माणसाचे 'बुरे दिन' सुरू आहेत," अशी तिखट प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली. महागाईच्या या 'वणव्यात' जनता होरपळत असताना सरकारचे 'मौन' म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून, गॅस सिलेंडरचे दर 500 रुपयांपर्यंत आणून महागाईवर नियंत्रण मिळवावे, अन्यथा यापुढे प्रत्येक गावात, प्रत्येक चौकात आंदोलनाचा भडका उडवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. एकाच व्यासपीठावर सर्व विरोधी पक्ष व महिला शक्ती एकवटल्याने उरणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



