"बोरी-पावभाट अंधारात: 4 फुटांवर लोंबकळणाऱ्या जीर्ण तारांमुळे जीवितास धोका, दिवसा 10 वेळा वीज गायब; नगराध्यक्षा घाणेकर महावितरणवर बरसल्या, अंडरग्राउंड केबलिंगसाठी निवेदन"

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 5/6/2026

"बोरी-पावभाट अंधारात: 4 फुटांवर लोंबकळणाऱ्या जीर्ण तारांमुळे जीवितास धोका, दिवसा 10 वेळा वीज गायब; नगराध्यक्षा घाणेकर महावितरणवर बरसल्या, अंडरग्राउंड केबलिंगसाठी निवेदन"









पत्रकार पूजा चव्हाण.

उरण, 5 जून 2026 (प्रतिनिधी) : उरण नगरपरिषद हद्दीतील बोरी-पावभाट परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येने त्रस्त झाले असून उन्हाळ्याच्या दिवसांत ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. दिवसातून 8 ते 10 वेळा वीज खंडित होत असून तासंतास वीज येत नाही. वीज आली तरी व्होल्टेज अत्यंत कमी असल्याने पंखे, कुलर, फ्रीज यांसारखी उपकरणे चालत नाहीत आणि सतत 'डिम लाईट' राहते. या गरमीच्या काळात लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


परिसरातील सध्याची ओव्हरहेड LT लाईन खूप जुनी व जीर्ण झाली असून ती जमिनीपासून फक्त चार फुटांवर लोंबकळत आहे. त्यामुळे वारंवार तार तुटणे, शॉर्टसर्किट होणे व जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांनी नगरसेवक अतुल ठाकूर, प्रमिला पवार, अमित म्हात्रे आणि वंदना पवार यांच्या सह्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने अंडरग्राउंड केबल टाकण्याबाबत निवेदन दिले आहे.


दिनांक 5 जून 2026 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या सर्व समस्यांवर एकमेव व कायमस्वरूपी उपाय म्हणजे जुन्या ओव्हरहेड लाईनच्या जागी अंडरग्राउंड केबलिंग करणे हाच आहे. केंद्र शासनाच्या RDSS म्हणजेच Revamped Distribution Sector Scheme सारख्या योजनेअंतर्गत हे काम तातडीने हाती घेणे शक्य असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. या समस्येबाबत महावितरणच्या विभागाकडे अनेकवेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता थेट कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन सदर परिसरात तात्काळ अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम प्राधान्याने मंजूर करून सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याची प्रत अधीक्षक अभियंता, मंडळ कार्यालय आणि तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे. 


नगराध्यक्षांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बोरी-पावभाट परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून महावितरण यावर काय कार्यवाही करते, याकडे संपूर्ण उरणकरांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top