शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 3/6/2026

"उरण नगरपरिषदेत 'लूटमार एक्सप्रेस' सुसाट; समीर जाधवांच्या 'सुवर्णकाळा'चा ऑडिटने करा 'पोस्टमार्टम' - मनसेचा डिमांड बॉम्ब!"


पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, रायगड - उरण नगरपरिषद म्हणजे सध्या 'आओ जाओ, घर तुम्हारा' टाइप भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा भन्नाट आरोप करत मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश बालचंद्र ठाकूर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारात तक्रारीचा बॉम्ब टाकला आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव यांच्या 'सुवर्ण' काळात पालिकेत कोट्यवधींचा खेळ झालाय, त्यामुळे आता 'विशेष ऑडिट'चा एक्स-रे काढून दोषींना इंजेक्शन द्या, अशी डिमांड ठाकूर यांनी केली आहे.


ठाकूरांच्या पत्रानुसार, समीर जाधव खुर्चीवर बसल्यापासून उरण नगरपरिषदेत 'काम कमी, कमिशन जास्त' हा फॉर्म्युला जोरात सुरू झाला. आरोग्य विभागाने तर कहरच केला - गाड्या घेतल्या, बायोगॅसच्या मशिन्स आणल्या, कचरा उचलायला, स्मशान झाडायला, बागेत झाडांना पाणी द्यायला सगळीकडे ठेके वाटले. 'स्वच्छ सर्वेक्षण'च्या नावाखाली तर पालिकेच्या तिजोरीला असा झाडू लावला की तिजोरीच स्वच्छ झाली! शहरात 56 कोटींचे काँक्रीटचे रस्ते ठोकूनही वरून डांबराचे पॅच मारायचे धंदे सुरूच होते. म्हणजे रस्ता पक्का, पण बिल काढायची सवय कच्ची! इमारतींच्या नुतनीकरणात तर नियमांना असा 'बायपास' दिला की नियमच आयसीयूमध्ये गेले.


आणि हो, पालिकेत माणसं कमी नाहीत म्हणे, तरी बाहेरून सफाईसाठी ठेकेदाराची माणसं आणून 'हजारोच्या बिलांचा पाऊस' पाडला गेला. पाणीपुरवठा विभागाने तर मशिनरी खरेदीत असा हात धुऊन घेतला की पाणी कमी, बिल जास्त! नगरपरिषद ऑफिस, आंबेडकर भवन, सावित्रीबाई फुले मार्केट, प्रशासक इमारत… सगळीकडे कोट्यवधींची 'किरकोळ दुरुस्ती' झाली. आणि बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल? त्याचे भाडे तर गेल्या पाच वर्षांपासून 'आमच्या गावी यात्रेला या' सारखं झालंय - ना ठेकेदार देतोय, ना पालिका मागतेय!


हा सगळा 'तमाशा' आमदार सचिन अहिर यांनी विधानसभेत उघड केला होता तेव्हा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'कारवाई करू' असं आश्वासन दिलं होतं, याची आठवण करून देत मनसेने आता 'आश्वासनाचे चीज करा' असं म्हटलंय. त्यामुळे मागच्या तीन वर्षांचा हिशोब 'सीटी स्कॅन' करून जाधव साहेबांच्या काळातील सगळे 'कारनामे' बाहेर काढा आणि दोषींना 'योग्य बक्षीस' द्या, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. या कॉमेडी शोच्या तिकिटाच्या प्रती राज ठाकरे आणि मुख्य सचिव सुजाता सौनीक यांनाही पाठवल्या आहेत. आता बघूया, 'ऑडिट'चा पडदा कधी उघडतो ते!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top