हिंदुसम्राट न्यूज
गव्यांची भरभराट अधोरेखित; राधानगरी–दाजीपूरमध्ये १३४ वन्यजीवांची नोंद.
राधानगरी प्रतिनिधी संजय कांबळे
राधानगरी-दाजीपूर अभयारण्य येथे नुकतीच पार पडलेली वन्यजीव गणना यशस्वी ठरली असून या उपक्रमात एकूण १३४ वन्यप्राणी व पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गव्यांची सर्वाधिक उपस्थिती आढळून आल्याने अभयारण्यातील जैवविविधतेची समृद्धी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या गणनेसाठी राधानगरी वनपरिक्षेत्रात २८ तर दाजीपूरमध्ये १४ अशा एकूण ४२ मचानांची उभारणी करण्यात आली होती. या मचानांवर बसून स्वयंसेवक आणि वनकर्मचाऱ्यांनी रात्रभर जंगलात ठाण मांडत वन्यजीवांचे निरीक्षण केले. अंधारातही जंगलातील हालचाली, प्राण्यांचे आवाज आणि त्यांच्या हालचालींचा अभ्यास करत ही गणना पार पडली.
पाणवठ्यांजवळ मचानांची उभारणी केल्यामुळे प्राणी सहजपणे निरीक्षणास आले. वनविभागाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोअरवेलच्या माध्यमातून पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिल्याने या भागात वन्यजीवांची उपस्थिती लक्षणीय वाढल्याचे दिसून आले.
या गणनेत गवा, हरीण, सांबर, रानडुक्कर, रानमांजर, माकड, मोर, साळिंदर, घोरपड तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. काही दुर्मीळ प्रजातींचेही दर्शन झाल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रात्रभर जंगलातील शांतता, पक्ष्यांचे स्वर आणि वन्यप्राण्यांची चाहूल अनुभवताना स्वयंसेवक भावनिक झाले. “ही रात्र आयुष्यभर लक्षात राहील,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.




