हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- पूजा चव्हाण.
उरण-द्रोणागिरीत ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात; धर्म, संस्कार व राष्ट्रभक्तीचा जागर.
*उरण/द्रोणागिरी, दि. १८ (पूजा चव्हाण ) :
सकल हिंदू समाज, द्रोणागिरी यांच्या वतीने शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी द्रोणागिरी-उरण येथे ‘विराट हिंदू संमेलन’चे आयोजन करण्यात आले. हिंदू धर्म, संस्कृती व राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी झालेल्या या संमेलनाला परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या विराट संमेलनाची सुरुवात भव्य दिंडी सोहळ्याने झाली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. मंचावर लहान मुलांनी शास्त्रीय संगीत व वाद्यांचे सुरेल सादरीकरण केले. तबला, हार्मोनियम व इतर वाद्यांसह भगव्या वस्त्रातील बालकलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय पारंपरिक शस्त्र प्रात्यक्षिकानेही उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
या संमेलनासाठी कोकण प्रांताचे धर्म जागरण प्रमुख राजेश कुंटे हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, या सोहळ्याला श्री श्री १००८ महामंडलेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज (वहाळ) आणि रमेश महाराज यादव (उरण) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांनी आपल्या कीर्तनातून धर्म, संस्कृती आणि सदाचार यांचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पंकज नागमोती यांनी हिंदू समाजातील एकता, संघटन आणि सामाजिक जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. मातृशक्ती वक्त्या सौ. ज्योती ताई वाघचौरे यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी विचार मांडले.
व्यासपीठामागील डिजिटल फलकावर प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा व ‘विराट हिंदू संमेलन’ असे ठळक अक्षरात लिहिले होते. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या संदेशाखाली हे संमेलन पार पडले. हिंदू धर्मातील विचारांचे आदान-प्रदान हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. ‘एक्स्प्रेशन्स संगीत अकादमी’ समूहाकडून शास्त्रीय संगीत व वाद्यांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण परिसर भगव्या पताका, रांगोळ्या व फुलांच्या सजावटीने सजला होता. भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला. द्रोणागिरी आणि उरण परिसरातील समस्त हिंदू बांधवांनी या मंगलमय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, द्रोणागिरी यांच्या वतीने करण्यात आले होते. ‘हिंदू समाजाला संघटित करणे, हिंदू समाजात समरसता वाढवणे, आपसात प्रेम-सद्भाव व सुख-दुःखात सहभागी होणे, तसेच हिंदू धर्म, संस्कृती व समाजाच्या पोषक विषयांना पुनर्स्थापित करणे’ हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. द्रोणागिरी येथील या विराट हिंदू संमेलनाला परिसरातील नागरिक, महिला, युवक व बालगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




