शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक:- 17/5/2026

खारपाडा टोल नाक्यावर LMV टोलमाफीचा वाद; ‘फ्री पास’चा उल्लेख नसल्याने मनसेचा आंदोलनाचा इशारा.



*उरण,दि.१७ (हिंदुसम्राट उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण) :

 मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर सर्व हलक्या मोटार वाहनांना सरसकट टोलमाफी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली असताना NHAI कडून मिळालेल्या उत्तरात ‘स्थानिकांना पास देणार’ असे म्हटले आहे. मात्र ‘फ्री पास’ असा स्पष्ट उल्लेख नसल्याने मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश बालचंद्र ठाकूर यांनी दिला आहे.  



दिनांक १२ मे २०२६ रोजी संदेश ठाकूर यांनी NHAI च्या प्रकल्प संचालकांना पत्र पाठवले होते. त्यात गेल्या १५ वर्षांपासून खड्डे, खराब रस्ता व अपघातांमुळे अनेक निष्पापांचा बळी गेल्याचे नमूद करत रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले तरी मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप केला. टोल सुरू करण्यापूर्वी स्वच्छ शौचालय, महिलांसाठी स्तनपान कक्ष, रुग्णवाहिका व प्रथमोपचार केंद्र, क्रेन सुविधा, सुरक्षित दर्जेदार रस्ता आणि टोल व्यवस्थापनात स्थानिक युवकांना रोजगार या सहा अटी पूर्ण करण्याची मागणी केली होती. पत्रात ‘स्थानिक व सर्व LMV वाहनांसाठी टोल पूर्णपणे मोफत करावा’ अशी स्पष्ट मागणी होती. विशेषतः MH 06 व MH 46 क्रमांकाच्या वाहनांना टोलमधून वगळावे, कारण हा रस्ता JSW कंपनी व क्रश सँड प्लांटच्या जड वाहनांमुळे खराब झाला असून सामान्य LMV वाहनधारकांवर अन्याय होत असल्याचे मनसेने म्हटले आहे.  



या पत्राला NHAI ने उत्तर दिले असून ‘स्थानिकांना पास देणार’ असे कळवले आहे. मात्र त्या पाससाठी शुल्क आकारले जाणार की तो मोफत असेल, याचा उल्लेख पत्रात नसल्याची माहिती मनसेने दिली. ‘आम्ही सरसकट सर्व एलएमव्ही गाड्या फ्री करा, अशी मागणी केली होती. पण NHAI ने केवळ पास देण्याचे म्हटले. फ्री पास असा उल्लेखच केला नाही,’ असे संदेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.  


खारपाडा येथे १५ मे २०२६ पासून टोल वसुली सुरू झाली असून प्रवाशांना ९५ रुपयांचा टोल द्यावा लागत आहे. टोल सुरू होण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते आंदोलनासाठी निघाले असता पळस्पे फाटा येथे पोलिसांनी त्यांना रोखले होते. त्यावेळी NHAI अधिकाऱ्यांसोबत चर्चेत मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने संघर्ष टळला होता. आता मात्र NHAI ने मागण्या अंशतःच मान्य केल्याने ‘जर त्यांनी MH 06 व MH 46 फ्री केल्या नाहीत आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या तर पुन्हा तीव्र आंदोलन करू,’ असा इशारा मनसेने दिला आहे.  


यापूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खारपाडा टोलनाक्यावर स्थानिक रहिवासी आणि सर्व एलएमव्ही वाहनांसाठी टोलमाफी लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र या सवलतीसाठी स्वच्छ शौचालये, स्तनपान कक्ष, रुग्णवाहिका, क्रेन सेवा, प्रकाशयुक्त रस्ता आणि स्थानिक युवकांना रोजगार या अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी शिवसेना व मनसेने केली होती. पुढील दहा दिवसांत सुविधा कार्यान्वित न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा आधीच देण्यात आला होता.  


NHAI च्या नियमानुसार टोल प्लाझापासून 20 किलोमीटरच्या आत राहणाऱ्या नागरिकांना 340 रुपयांत एक महिन्याचा अनलिमिटेड पास मिळतो. मात्र मनसेची मागणी सरसकट टोलमाफीची आहे, केवळ सवलतीच्या पासची नाही. ‘सुविधा आधी, टोल नंतर’ अशी भूमिका घेत मनसेने आता NHAI ला पुन्हा घेरण्याची तयारी केली आहे. ‘फ्री पास’चा उल्लेख नसलेले पत्र म्हणजे स्थानिकांची दिशाभूल असल्याचा आरोप मनसेने केला आहे.या वेळी पराग बालड, सतीश पटेल उरण पनवेल मनसेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top