हिंदूसम्राट / नवी मुंबई
टाटा पॉवरने जनसेवेसाठी उचलले पुढचे पाऊल: भिवपुरी-कर्जत परिसरातील ४,००० हून अधिक स्थानिकांसाठी सुरु केले कल्याणकारी उपक्रम...
अजित पाटील / उरण
- प्रमुख उपक्रमांमध्ये ~१,६०० विद्यार्थ्यांना लाभ देणारी नवीन विज्ञान प्रयोगशाळा, बहुउद्देशीय हॉल, आरओ प्लांट, संगणक, बेंचेस आणि क्रीडा साहित्याचे वितरण; सुमारे २०० महिला आणि ७० तरुणांसाठी अनुक्रमे कौशल्य प्रशिक्षण व टूलकिट; तसेच कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत आरोग्य सुविधांचा समावेश आहे, ज्याद्वारे ४० हून अधिक गावांना सेवा पुरवली जाईल.
कर्जत, २३ एप्रिल, २०२६: टाटा पॉवरने कर्जतच्या भिवपुरी येथील गौळवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवेशी संबंधित सामाजिक कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ केला. या उपक्रमांद्वारे टाटा पॉवरने आपल्या १,००० मेगावॅटच्या 'पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट' क्षेत्रातील नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले वचन पुन्हा एकदा पाळले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन टाटा पॉवरचे श्री. हिमल तिवारी (सीएचआरओ आणि हेड - सस्टेनेबिलिटी व सीएसआर), श्री. प्रीतम कुमार (चीफ - हायड्रो प्रोजेक्ट्स) आणि श्री. अजय कोण्णूर (चीफ - हायड्रो) यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. याचसोबत, नवीन बहुउद्देशीय हॉल, विज्ञान प्रयोगशाळा आणि आरओ प्लांट यांसारख्या सुविधा सामान्य जनतेच्या उपयोगसाठी औपचारिकपणे खुल्या करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी टाटा पॉवरच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली आणि कंपनी कशाप्रकारे तळागाळातील शिक्षण व रोजगार सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला.
सुधारित पायाभूत सुविधांमुळे सुमारे १,६०० विद्यार्थ्यांना फायदा होईल. यामध्ये गौळवाडी माध्यमिक विद्यालयातील सुमारे १,००० विद्यार्थ्यांसाठी नवीन विज्ञान प्रयोगशाळा, बहुउद्देशीय हॉल आणि आरओ प्लांटचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, परिसरातील इतर शाळांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना संगणक, प्रिंटर, यूपीएस, बेन्च आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
टाटा पॉवरच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत, २०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र आणि टूलकिट देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग आणि मेसनरी यांसारख्या तांत्रिक कोर्सेससोबतच ब्युटी केअर, आरी वर्क आणि फॅब्रिक पेंटिंग यांसारखी कौशल्येही शिकवण्यात आली. महिलांना स्वावलंबी बनवणे, जेणेकरून त्या स्वतःची कमाई करून आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देऊ शकतील, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच, सुमारे ७० तरुणांनाही कौशल्य प्रशिक्षण आणि टूलकिट देण्यात आले असून, यामुळे ते तांत्रिक आणि सेवा क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनतील.
कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मल्टीपॅरामीटर मॉनिटर, सक्शन मशीन आणि संगणक यांसारखी वैद्यकीय उपकरणे सुपूर्द करण्यात आली. हे केंद्र पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट क्षेत्रातील ४० हून अधिक गावांना आरोग्य सेवा पुरवते. याशिवाय, उत्तम स्वच्छता आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने या केंद्रातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरणही केले आहे, ज्यामुळे परिसरातील गावांमधील सुमारे १,००० नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल.
या सर्व प्रयत्नांमुळे शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांत ४,००० हून अधिक स्थानिक रहिवाशांना लाभ मिळणे अपेक्षित आहे. हा उपक्रम स्थानिक समुदायांना सक्षम बनवण्याप्रती आणि त्यांना स्वावलंबी करण्याप्रती टाटा पॉवरची दीर्घकालीन बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करतो.


