शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 26/5/2026

उरणमध्ये छायाचित्रणाची नवी पहाट : ४० विद्यार्थ्यांना मिळाले ‘लेन्स’चे धडे, जेएनपीए व फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टचा उपक्रम.







पत्रकार / पूजा चव्हाण.

उरण, 25 मे 2026 : निसर्गरम्य आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या उरण तालुक्यातील नवतरुणांना छायाचित्रण क्षेत्रातील कौशल्याची ओळख व्हावी, या उद्देशाने ‘फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट’ व जेएनपीए यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्राथमिक छायाचित्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. २३ व २४ मे रोजी उरण एज्युकेशन सोसायटीच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यशाळेत उरण परिसरातील ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 


आजच्या मोबाईल युगात प्रत्येकाच्या हातात कॅमेरा असला तरी तांत्रिक ज्ञानाअभावी प्रभावी छायाचित्रण करता येत नाही. हीच उणीव भरून काढण्यासाठी आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना छायाचित्रणाचा इतिहास, मूलभूत तत्त्वे, प्रकाशाचा नैसर्गिक वापर, फ्रेमिंग, रंगसंगती आणि रेषांचा वापर याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध छायाचित्रकार व पद्मश्री सन्मानित सुधारक ओलवे लाभले. सामान्य जीवनातील सामाजिक वास्तव आपल्या कॅमेऱ्यातून जगासमोर मांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेले ओलवे हे २००५ मध्ये नॅशनल जिओग्राफीच्या “ऑल रोड्स फोटोग्राफी प्रोग्राम”चे पुरस्कार विजेते आहेत. २०१६ मध्ये त्यांना सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यासह ज्येष्ठ छायाचित्रकार व पत्रकार विरेश मोडखरकर यांनी ‘माणूस आणि कॅमेरा’ यातील साम्य उलगडून दाखवत विद्यार्थ्यांना छायाचित्रणाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. अनेक तज्ज्ञ मान्यवरांनी दोन दिवस विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. 


कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना उरण शहरातील विविध ठिकाणी नेऊन प्रत्यक्ष छायाचित्रणाचा अनुभव देण्यात आला. काढलेल्या छायाचित्रांवर तज्ज्ञांनी चर्चा करून सुधारणांसाठी मोलाच्या सूचना केल्या. ‘फोटो काढणे’ आणि ‘फोटो बोलका करणे’ यातील फरक विद्यार्थ्यांना यातून उलगडला. 


कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सुधारक ओलवे यांनी महत्त्वाची घोषणा केली. या ४० विद्यार्थ्यांना अधिक तांत्रिक व प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी दर शनिवारी नियमित छायाचित्रण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा आवड जोपासायची आहे, अशा नवीन विद्यार्थ्यांनीही या वर्गात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जेएनपीएच्या सहयोगामुळे उरणसारख्या औद्योगिक पट्ट्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. 


*प्रशिक्षणार्थींचा अनुभव*


*तन्वी पोवार* म्हणाली, “छायाचित्रणाची आवड होती, पण शास्त्रशुद्ध माहिती नव्हती. माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक शिकायला मिळाले. मार्गदर्शकांची टीम उत्तम असल्याने सुरुवातीचे धडे पक्के झाले.”


*कुंज पाटील* याने सांगितले, “दोन दिवसांत रंग, प्रकाश, रेषा यांचे छायाचित्रातील महत्त्व कळले. प्रत्यक्ष बाहेर जाऊन फोटो काढण्याचा अनुभव खास होता. आमच्या चुकांवर चर्चा होऊन फोटो अधिक दर्जेदार कसा करायचा हे शिकायला मिळाले.”


उरणसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या भागात कला व तंत्रज्ञानाची सांगड घालणारे असे उपक्रम नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा देणारे ठरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top