हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 26/5/2026
राधानगरी तालुका निवृत्त मुख्याध्यापक संघाचे कार्य आदर्शवत : डी. एस. पाटील.
राधानगरी प्रतिनिधी संजय कांबळे.
राधानगरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक निवृत्त मुख्याध्यापक संघाचे कार्य आदर्शवत असून राज्य व जिल्हा संघटनेच्या विविध आदेशांची आणि उपक्रमांची तालुका संघाकडून तत्पर अंमलबजावणी केली जाते, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे कार्याध्यक्ष डी. एस. पाटील यांनी काढले.
भोगावती हायस्कूल येथे निवृत्त मुख्याध्यापकांच्या विविध समस्या तसेच शासकीय पातळीवरील कामकाजाबाबत आयोजित बैठकीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्षभरात निधन झालेल्या मुख्याध्यापकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष ए. आर. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ, मुंबई या शिखर संस्थेच्या कोल्हापूर प्रादेशिक विभागाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल डी. एस. पाटील यांचा व्ही. टी. एरूडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा संघाचे अध्यक्ष एम. के. आळवेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब बुगडे, सचिव संपन्न कळके, सहसचिव एस. वाय. पाटील यांचा राधानगरी तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचाही गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
बैठकीत नव्याने सेवानिवृत्त सभासद नोंदणी, पेन्शन विक्री कालावधी १५ ऐवजी १२ वर्षे करण्याची मागणी, ग्रॅज्युइटीची मर्यादा १४ लाखांवरून २० लाख करण्याची मागणी, १ जानेवारी ते ३१ मे दरम्यान निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांना काल्पनिक वेतनवाढ, रजा रोखीकरण आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी एम. के. आळवेकर, बाबासाहेब बुगडे, संपन्न कळके व एस. वाय. पाटील यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला राधानगरी तालुक्यातील ए. एस. भागाजे, श्याम पाटील, एम. व्ही. सुतार, डी. डी. पाटील, बी. जी. पाटील, ए. बी. पाटील, एस. टी. पानारी, एम. डी. नलवडे, के. बी. पाटील, के. जी. लाड, एस. पी. शिंदे, जी. एस. सोकासणे, बी. एन. मगदूम, एस. डी. मिसाळ, ए. एम. पाटील, आनंदा जाधव यांच्यासह ३५ हून अधिक निवृत्त मुख्याध्यापक उपस्थित होते.जिल्हा संघटनेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य ए. एस. भागाजे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य श्याम पाटील यांनी आभार मानले.



