हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 25/5/2026
मुंबई-गोवा महामार्गावर ‘टोलचा बोजा’ : खारपाडा नाका सुरू होताच छावा क्रांतिवीरचा विरोध, शैलेश घरत म्हणाले - ‘रस्ता अपूर्ण, मग टोल कशाला?’
पत्रकार / पूजा चव्हाण.
*पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 18 वर्षांपासून रखडलेले असून अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण स्थितीत असतानाच पेण तालुक्यातील खारपाडा येथे NHAI ने टोलवसुली सुरू केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा क्रांतिवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेने खारपाडा टोलला कडाडून विरोध दर्शवला आहे.
पनवेल तालुका अध्यक्ष शैलेश घरत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. "मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण स्थितीत असताना खारपाडा टोल अचानक चालू करणे हे योग्य नाही. मागील 18 वर्षांत महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. आजही काम अर्ध स्थितीत असताना अचानक सर्वसामान्यांच्या खिशाला कातर लावण्यासाठी हा टोल NHAI ने चालू केला आहे," असा आरोप शैलेश घरत यांनी केला.
यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष शैलेश घरत, खालापूर तालुका अध्यक्ष भानुदास जांभळे, पनवेल तालुका संघटक अनंत कोंडिलकर तसेच पनवेल व खालापूर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते. छावा क्रांतिवीरचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या पत्रकाची दखल न घेतल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे, असे घरत यांनी स्पष्ट केले. 'जय शिवराय जय शंभूराजे'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
वास्तविक मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते कासू या 42 किमीच्या पहिल्या टप्प्यासाठी खारपाडा येथे 15 मे 2026 पासून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. मात्र महामार्गावर अनेक ठिकाणी साईट पट्ट्या, उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. कोलाड, नागोठणे, कोलेटी येथील पुलांची कामे अर्धवट असून माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे कामही प्रलंबित आहे.
टोल सुरू होताच शिवसेना ठाकरे गट, मनसे, शेतकरी कामगार पक्षासह विविध संघटनांनी आंदोलन केले. ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर रायगड जिल्ह्यातील MH-06 नोंदणीकृत वाहनांना टोलमाफी देण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र ही सवलत केवळ पेण आणि पनवेल शहर परिसरापुरती मर्यादित असल्याने ‘रायगडकरांना टोलमाफी’ ही घोषणा केवळ धूळफेक ठरल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, वाहनचालक किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता टोलनाका सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे. "महामार्ग पूर्ण झालेला नाही, अनेक ठिकाणी खड्डे आहेत, सेवा रस्ते तयार नाहीत, वाहतूक कोंडीचा त्रास कायम आहे. मग नागरिकांनी टोल कशासाठी भरायचा?" असा सवाल स्थानिक विचारत आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मे पर्यंत महामार्गाचे काम 100% पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता काम वेळेत पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मंत्री अदिती तटकरे यांनीही टोलवसुलीला विरोध दर्शवत गडकरींची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
छावा क्रांतिवीर सामाजिक संस्थेने स्थानिक वाहनांना तातडीने टोलमुक्ती द्यावी आणि अपूर्ण कामे प्रथम पूर्ण करावीत, अशी मागणी लावून धरली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


