हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 25/5/2026
जेएनपीएची कोंडी फुटली : चालक टंचाईवर मात, CFS कडे जाणाऱ्या कंटेनर्सची संख्या 2500 वरून 450 वर...
पत्रकार / पूजा चव्हाण.
मुंबई, 24 मे 2026 :* देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण म्हणजेच जेएनपीएने कंटेनर वाहतुकीतील कोंडीवर यशस्वी मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र चालक टंचाईमुळे CFS कडे जाणारे हजारो कंटेनर 15 दिवसांपेक्षा जास्त काळ अडकून पडले होते. मात्र जेएनपीएने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे ही संख्या 2500 वरून थेट 450 पर्यंत खाली आली आहे. पुढील आठवडाभरात ही संख्या नगण्य पातळीवर येईल, असा विश्वास बंदर प्रशासनाने व्यक्त केला आहे.
*सध्याची परिस्थिती आणि आकडेवारी*
आजच्या घडीला आयात कंटेनर्सच्या सरासरी दैनंदिन डिस्चार्जचे प्रमाण 12,237 टीईयू इतके असून, आयात-CFS प्रलंबित कंटेनर्सची संख्या सध्या 40,809 टीईयू आहे. गेट मूव्हमेंटअंतर्गत एकूण 17,425 टीईयू हालचाल नोंदवली गेली. त्यात 7,950 टीईयू इनबाउंड तर 9475 टीईयू आउटबाउंड हालचालींचा समावेश आहे. एप्रिल 2026 मध्ये जेएन पोर्टमध्ये सरासरी गेट मूव्हमेंट 18,000 टीईयू नोंदवली गेली. मागील 24 तासांत दैनंदिन गेट मूव्हमेंट 18,196 टीईयू झाली असून चालू वर्षातील एकूण दैनंदिन सरासरी 17,684 टीईयू आहे. दैनंदिन कंटेनर वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली असून दररोज सुमारे 18,000 टीईयू गेट ऑपरेशन होत आहे आणि जून 2026 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे.
*कोंडी फोडण्यासाठी जेएनपीएचे 'मिशन मोड' प्रयत्न*
बंदराने संबंधित घटकांशी सल्लामसलत करून ही समस्या कमी करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी जेएन पोर्टकडून संबंधित भागधारकांसोबत दररोज नियमित बैठका घेतल्या जात आहेत. तसेच, परिस्थितीचा सतत आढावा घेऊन तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्यासाठी दिवसभर कार्यरत असलेली एक मॉनिटरिंग सेल देखील कार्यरत आहे.
1. *रेल्वेवर भर* : कंटेनर्स CFS कडे हलवण्यासाठी जेएनपीएकडून बंदरातून जवळील CFS पर्यंत अतिरिक्त रेल्वे वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत दररोज सुमारे 3 ते 4 रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत.
2. *चालकांची कमतरता भरून काढली* : चालकांची कमतरता दूर करण्यासाठी जेएन पोर्टकडून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांमधून चालकांना आणण्यासाठी विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली. ही रेल्वे मालदा (पश्चिम बंगाल) – पूर्व उत्तर प्रदेश – मध्य प्रदेश – पनवेल या मार्गावर चालवण्यात आली. तसेच, अधिक चालक उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्रातील दैनिक वृत्तपत्रे तसेच अखिल भारतीय स्तरावरील वृत्तवाहिन्यांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या.
3. *ग्रीन चॅनेल आणि फेऱ्यांत वाढ* : CFS टीटींच्या जलद प्रवेशासाठी सुमारे 100 वाहनांसाठी ग्रीन चॅनेल गेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे ट्रेलरच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली. पूर्वी ट्रेलरना दिवसाला केवळ 2 फेऱ्या करता येत होत्या, तर आता ते दिवसाला 3 ते 4 फेऱ्या करू शकत आहेत. यामुळे यार्डमधील वाढत असलेली प्रलंबित कंटेनर्सची संख्या नियंत्रणात आणण्यास मोठी मदत झाली आहे.
4. *रिकाम्या प्रवासाला ब्रेक* : दूरवरच्या भागांतून निर्यात कंटेनर्स घेऊन येणाऱ्या ट्रेलर्सना परतीच्या प्रवासात आयात कंटेनर्स वाहून नेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
5. *शुल्कात सवलत* : बंदर प्रशासनाने कंटेनर टर्मिनल ऑपरेटर्ससोबत समन्वय साधून काही शुल्कांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘चेंज ऑफ मूव्हमेंट मोड’ शुल्क माफ करणे, अनेक वेळा शिफ्टिंग आवश्यक असतानाही केवळ एकदाच शिफ्टिंग शुल्क आकारणे, तसेच रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक शुल्काचे सुसूत्रीकरण करणे यांचा समावेश आहे.
6. *सीमाशुल्क विभागाची मदत* : या परिस्थितीत व्यापाराला दिलासा देण्यासाठी सीमाशुल्क विभागानेही विविध उपाययोजना केल्या आहेत. एका ट्रेलरमध्ये दोन कंटेनर्स एकत्र स्कॅन करता यावेत यासाठी स्कॅनिंग प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. तसेच, CFS मधील कंटेनर्सची जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वे वाहतुकीकडे वळण्यास सीमाशुल्क विभागाकडून तातडीने परवानगी देण्यात आली.
*चालक टंचाईचे कारण काय?*
ही चालक टंचाई हंगामी स्वरूपाची असून, दरवर्षी याच कालावधीत चालक शेतीची कामे, सुट्ट्या तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी आपल्या मूळ गावी परत जातात. मात्र, यावर्षी पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशातील निवडणुकांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या भागांतून मोठ्या प्रमाणावर चालक कार्यरत असतात. यासोबतच अन्नपुरवठा आणि महामार्गावरील सहायक सेवांमध्ये निर्माण झालेल्या अडचणींचाही या परिस्थितीवर परिणाम झाला आहे.
*यशस्वी समन्वय*
केरी इंडेक्स CFS ने जेएनपीएतील कंटेनर टर्मिनलपैकी एक असलेल्या जीटीआयमार्फत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतच्या सहा तासांच्या कालावधीत 400 हून अधिक टीईयू कंटेनर्सची यशस्वी वाहतूक पूर्ण केली आहे. तसेच, मागील 9 दिवसांत पोलारिस लॉजिस्टिक्स पार्क CFS साठी 7541 टीईयू कंटेनर्सची वाहतूक करण्यात आली आहे. एनएसआयजीटी बंदरातील त्यांची प्रलंबित वाहतूक पूर्ण झाली असून, आज एनएसआयसीटी आणि एनएसएफटी बंदरांमधील कंटेनर्सच्या वाहतुकीवर भर दिला जाणार आहे. कंटेनर्सच्या वाहतुकीसाठी नासकोवा संस्थेकडून 70 ते 80 ट्रॅक्टर ट्रेलर तैनात केले आहेत.
जेएनपीए मंत्रालय आणि सर्व संबंधित भागधारकांच्या समन्वयाने कार्य करत असून, बंदरातील कार्यप्रणाली सुरळीत ठेवणे, लॉजिस्टिकमधील अडथळे कमी करणे तसेच निर्यातदार, आयातदार, वाहतूकदार आणि व्यापक व्यापारी समुदायाच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.


