हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 22/5/2026
उरणमध्ये रविवारी विराट हिंदू संमेलन; श्रीराम दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह धर्मजागृतीचा संदेश.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण : हिंदू समाजामध्ये एकता, राष्ट्रभक्ती आणि हिंदू धर्माबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, उरण यांच्या वतीने रविवारी दि. २४ मे २०२६ रोजी “विराट हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. उरण नगरपरिषदेच्या शाळा मैदान, पेन्शनर्स पार्क येथे सायंकाळी हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार असून, संपूर्ण उरण परिसरात या संमेलनाबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संमेलनाच्या निमित्ताने सायंकाळी ५:३० वाजता भव्य श्रीराम दिंडी आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजर आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून जाणार असून, या दिंडीत मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यानंतर संमेलनस्थळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि हिंदू धर्माचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. तसेच समाजातील विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शनही या कार्यक्रमात होणार आहे.
या विराट हिंदू संमेलनासाठी राष्ट्रीय संत पूज्य निलेश महाराज (अमरावती) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, प्रेरणादायी वक्ते उमेशजी गायकवाड (मुंबई) हे हिंदू समाजातील ऐक्य, संस्कार आणि राष्ट्रभक्ती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की, आजच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत हिंदू समाजाने एकत्र येऊन आपल्या परंपरा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचे जतन करण्याची गरज आहे. त्याच उद्देशातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सकल हिंदू समाज, उरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.


