शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज

दिनांक :- 22/5/2026


ज्ञानाच्या मंदिरातच भ्रष्टाचाराचा अंधार! NEET पेपरफुटी प्रकरणामुळे खासगी शिकवणी क्षेत्रावर संशयाची सावली नांदेडमधील सर्व क्लासेसच्या चौकशीची नागरिकांची मागणी.



नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड.


नांदेड:- दि.२२.देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण क्षेत्रातील काळे वास्तव समोर आणले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असलेल्या काही खासगी शिकवणी संस्थांनीच पैशाच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख केल्याचा संतापजनक आरोप होत आहे.


लातूरमधील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटर (RCC) आणि पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही.कुलकर्णी यांच्यातील संबंध उघड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. “मोटेगावकर सर” म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले नाव आता गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे.


सीबीआयच्या तपासात मॉक टेस्टमधील तब्बल ४२ प्रश्न मुख्य NEET परीक्षेत जसेच्या तसे आल्याची बाब समोर आली आहे.परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, मोबाईलमध्ये लीक प्रश्नपत्रिकेचे पुरावे आढळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.


विद्यार्थ्यांना “मेहनत करा, प्रामाणिक रहा” असे शिकवणारे काही शिक्षकच जर गैरमार्गाने पैसे कमवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असतील,तर ही शिक्षण व्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.


एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून दिवस-रात्र अभ्यास करतो… आई-वडील स्वतःच्या गरजा कमी करून लाखो रुपयांची फी भरतात… पण दुसऱ्या बाजूला काही जण पैशांच्या जोरावर प्रश्नपत्रिका विकत घेत असतील,तर मेहनती विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खून होत नाही का? असा सवाल आता समाजातून उपस्थित होत आहे.

आज खासगी क्लासेस हे शिक्षणाचे केंद्र राहिले नसून अनेक ठिकाणी ते पैशांचे बाजार बनत चालल्याची टीका पालकांमधून होत आहे. नांदेडसह मराठवाड्यात खासगी क्लासेसचे मोठे जाळे निर्माण झाले आहे.मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली लाखो रुपयांची फी आकारली जाते. परंतु या संस्थांमध्ये नेमके काय सुरू आहे? विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते की पैशांच्या व्यवहारातून यश विकले जात आहे? याची सखोल चौकशी होणे आता काळाची गरज बनली आहे.


विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व खासगी शिकवणी क्लासेसची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,अशी जोरदार मागणी आता नागरिक, पालक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.


“आम्ही रात्रभर अभ्यास करायचा… आमचे आई-वडील कर्ज काढून फी भरायचे… आणि काही जण पैसे देऊन पेपर विकत घ्यायचे… मग आमच्या मेहनतीची किंमत काय?” असा आक्रोश आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनातून उमटताना दिसत आहे.


आज गरज आहे ती शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवण्याची… गरज आहे ती विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील विश्वास पुन्हा जागवण्याची… आणि गरज आहे ती “शिक्षक” या पवित्र शब्दाचा सन्मान वाचवण्याची…

“विद्यार्थ्यांचे भविष्य हे कोणाच्याही पैशाच्या हव्यासापेक्षा मोठे असते!”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top