शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 21/5/2026

येवला वन विभागाचे ८ जण एकाच वेळी एसीबीच्या जाळ्यातआक्खं कार्यालय भ्रष्टाचारी नाशिक जिल्ह्यात प्रचंड खळबळ.


विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड.


नाशिक:- दि.१९.जिल्यातील येवला तालुक्या मधील सामान्य नागरिकांची कामे अडवून लाचेची मागणी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा बुरखा फाडणारी एक धक्कादायक आणि ऐतिहासिक कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने येवला तालुक्यात केली आहे.


 शेतातील सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्यास परवानगी देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना येवला वन परिक्षेत्र कार्यालयातील वनपाल, वनरक्षक,लिपिक,वनमजूर आणि खाजगी चालकांसह तब्बल ८ जणांना एकाच वेळी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.


 "आक्खं कार्यालयच भ्रष्टाचारी" असल्याचे सिद्ध करणाऱ्या या महाकारवाईमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि वन विभागात प्रचंड खळबळ उडाली असून,शासकीय वर्तुळात मोठी घबराट पसरली आहे.


​या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की,दहेगाव पाटोदा शिवारातील शेत गट क्रमांक ६१ मध्ये तक्रारदाराची दोन हेक्टर ४९ आर जमीन आहे.


 या शेतातील सागाचे झाड तोडून ते विकण्याची रीतसर परवानगी मिळावी म्हणून त्यांनी येवला वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.मात्र,हक्काच्या झाडाची परवानगी देण्यासाठी या कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची लाचेची भूक खवळली. संशयितांनी आपापसात हिस्सेदारी ठरवून एकूण १९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.


 एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणीत या सर्वांनी लाचेच्या मागणीस प्रोत्साहन देऊन ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार मंगळवारी टाकलेल्या सापळ्यात ११ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना या ८ जणांच्या टोळीला रंगेहाथ जेरबंद करण्यात आले.


​या भ्रष्ट साखळीत कोणाचा किती हिस्सा होता,हे पाहून एसीबीचे अधिकारीही चक्रावून गेले.लाचेच्या रकमेमधील हिस्सेदारीनुसार,वनपाल भाऊसाहेब माळी याच्यासाठी ५ हजार रुपये,वनरक्षक पंकज नागपुरे याने स्वतःसाठी २ हजार रुपये,कनिष्ठ लिपिक प्रवीण भोसले याने १ हजार रुपये, वनरक्षक आकाश कोळी याने १ हजार रुपये,वनमजूर विजय लोंढे याने १ हजार रुपये, खाजगी डेटा चालक निखिल आरणे याने १ हजार रुपये आणि शासकीय वाहनावरील खाजगी चालक सुनील भुरुक याने ५०० रुपये स्वीकारले,तर वनमजूर रामनाथ भोरकडे याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.पकडण्यात आलेल्या संशयितांमध्ये वनपाल भाऊसाहेब पंढरीनाथ माळी (वय ३९), वनरक्षक पंकज राजेंद्र नागपुरे (वय ३५), कनिष्ठ लिपिक प्रवीण बाळासाहेब भोसले (वय २१), वनरक्षक आकाश नामदेव कोळी (वय ३१), वनमजूर विजय शिवाजी लोंढे (वय ४९), वनमजूर रामनाथ लक्ष्मण भोरकडे (वय ५५) तसेच खाजगी डेटा चालक निखिल सुनील आरणे (वय २९) आणि खाजगी वाहन चालक सुनील भगवान भुरुक (वय ३३) यांचा समावेश आहे.एकाच वेळी ६ लोकसेवक आणि २ खाजगी कर्मचारी जाळ्यात सापडल्याने या विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.


​ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक क्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक पूनम केदार तर सहायक सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रतिभा आबूज यांनी चोख जबाबदारी सांभाळली.या कारवाई पथकात पोलीस हवालदार युवराज खांडवी, प्रभाकर गवळी,नितीन नेटारे, किरण धुळे आणि गणेश निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक प्रतिभा आबूज करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top