शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

 हिंदुसम्राट न्यूज

दिनांक :- 21/5/2026


काळम्मावाडीच्या धोकादायक डोहात तरुणाचा बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या युवकावर काळाचा घाला; चार तासांच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह बाहेर.



 राधानगरी प्रतिनिधी संजय कांबळे

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथे दूधगंगा नदीतील धोकादायक डोहात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सनथ अनिता वराळे (वय ३०, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनथ वराळे हे अकोला जिल्ह्यातील शेगाव येथे आरोग्य विभागात कार्यरत होते. ते आपल्या चार मित्रांसह राधानगरी तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काळम्मावाडी येथील दूधगंगा नदी पात्रातील काळुकी डोहाजवळील रेडीकुडी डोहात फेसाळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी सर्वजण उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सनथ वराळे खोल पाण्यात जाऊन बुडाले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत राधानगरी पोलिसांत खबर दिली. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली; मात्र अंधार पडल्यामुळे मोहीम थांबवण्यात आली.

गुरुवारी सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या रेस्क्यू टीमने राधानगरी पोलिस व काळम्मावाडी धरण सुरक्षा रक्षक पथकाच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. जीवन रक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सनथ वराळे यांचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

दरम्यान, काळम्मावाडी येथील या धोकादायक डोहात यापूर्वीही दहा पेक्षा अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रशासनाने धोक्याचे फलक लावून प्रवेशबंदी केली असली तरी पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारून पर्यटकांना कडक प्रवेशबंदी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top