हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 21/5/2026
उरणमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन.
( हिंदुसम्राट उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यांकडून )
उरण, दि. २० मे २०२६ :* उरण शहरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी उरण पोलिसांनी प्रसारमाध्यमे आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदिश देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.५५ वाजता कर्तव्यावर असलेल्या बीट मार्शल क्र. ०३ च्या अंमलदारांना उरण शहरात एक अनोळखी बेवारस इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेतून त्याला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे दाखल करण्यात आले. मात्र कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सायंकाळी ४.५५ वाजता त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अ.मु. रजि. नं. ३९/२०२६, भा.ना.सु. संहिता कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या मृत्यूबाबत कोणालाही शंका अथवा तक्रार नाही.
मयत इसमाचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे, बांधा सडपातळ, वर्ण काळा असून सर्व अंगातून कुजकट व दुर्गंधीयुक्त वास येत होता. त्याच्या अंगात काळ्या-निळ्या रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, पांढऱ्या रंगाची सॅंडो बनियान व चॉकलेटी रंगाची अंडरपॅन्ट होती.
सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा त्याचे नातेवाईक माहीत असल्यास उरण पोलीस ठाण्याचे सपोनि जगदिश देवरे यांच्याशी मो. ९७०२४२१५३३ किंवा सपोनि नितीन खाडे यांच्याशी मो. ६३९०४८४००८ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


