हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 20/5/2026
भारताची जनगणना 2027 टप्पा 1 अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात प्रत्यक्ष कामास सुरुवात.
नवी मुंबई : हिंदूसम्राट प्रतिनिधी :विरेंद्र म्हात्रे
भारत सरकारतर्फे देशभर राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाच्या टप्पा 1 – गृह सूचीकरण व गृहनिर्माण गणना या अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 मे पासून अधिकृतरीत्या सुरुवात करण्यात आली आहे.
जनगणना प्रक्रियेत यंदा डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असून माहिती संकलनाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. हा उपक्रम दि. 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, या मोहिमेत सुमारे 2000 कर्मचारी प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती अभिषेक पराडकर, उपायुक्त (जनगणना) यांच्याकडून देण्यात आली.
या मोहिमेद्वारे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक घर, कुटुंब, इमारत, व्यावसायिक आस्थापना तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेले प्रगणक (Enumerators) आणि पर्यवेक्षक (Supervisors) नागरिकांच्या घरांना भेट देऊन माहिती संकलनाचे काम करणार आहेत.
पनवेल महानगरपालिका महापौर नितिन पाटील, आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “जनगणना ही देशाच्या विकासाचे धोरण, शासकीय योजना, नागरी सुविधा आणि भविष्यातील नियोजन यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने ही राष्ट्रीय जबाबदारी समजून प्रगणकांना पूर्ण सहकार्य करावे.”
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्यावी तसेच जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रत्येक प्रभागामध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
जनगणना टप्पा 1 मोहिमेमुळे भविष्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, परिवहन आणि इतर विकासकामांचे अचूक नियोजन करण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जनगणना संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी
भारत सरकार गृहमंत्रालय विभागाच्या अंतर्गत जनगणना संचालनालय, महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 18 मे रोजी पनवेल महापालिकेस भेट देऊन चालू असलेल्या कामाची माहिती घेतली...




