हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 16/5/2026
पैशांच्या लालसेपोटी जन्मदात्या पित्याची झोपेतच निर्घृण हत्या..*
अवघ्या पाच तासांत आरोपी गजाआड !*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१६.जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हटक्याळ गावात एका भयंकर घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. पैशांची सततची चणचण आणि त्यातून उद्भवणाऱ्या कौटुंबिक वादाने एका जन्मदात्या बापाचा नाहक बळी घेतला आहे. स्वतःच्याच पित्याचा क्रूरपणे अंत करत एका 27 वर्षीय तरुणाने माणुसकीला काळीमा फासला आहे. या घटनेतील प्रमुख आरोपीला पोलिसांनी तत्परता दाखवत केवळ 5 तासांच्या आत अटक करून गजाआड केले आहे.
सुरेश बाबूराव मोरे (वय 48) हे कुटुंबासोबत हटक्याळ येथे वास्तव्यास होते.गुरुवार 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास घरातील सर्व सदस्य जेवण आटोपून झोपी गेले होते. रात्री साधारण 11 वाजता सगळे गाढ निद्रेत असताना मुलगा सुदर्शन सुरेश मोरे (वय 27) याच्या डोक्यात प्रचंड रागाची ठिणगी पडली.त्याने घराच्या अंगणात पडलेला एक मोठा दगड उचलून आणला आणि अत्यंत थंड डोक्याने तो जड दगड झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर हाणला.या भीषण हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेश बाबूराव मोरे यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.या धक्कादायक प्रसंगामध्ये घरात मयताची आई चौत्राबाई मोरे तसेच वडील बाबूराव मोरे आणि भाऊ सुजित मोरे हे देखील उपस्थित होते.
या जीवघेण्या प्रकारानंतर आरोपी सुदर्शन सुरेश मोरे याने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत गावातून तात्काळ पोबारा केला.त्यानंतर मयताची आई चौत्राबाई मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार बाप-लेकामध्ये बऱ्याच काळापासून पैशांवरून सतत खटके उडत होते.स्वतःच्या घरखर्चासाठी तसेच इतर व्यक्तिगत कामांसाठी वडील पैसे देत नसल्याचा मोठा राग आरोपीच्या मनात खदखदत होता.याच रागातून त्याने वडिलांना कायमचे संपवण्याचा कट रचून झोपेतच त्यांचा काटा काढला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
गुन्हा उघडकीस येताच कंधार पोलिसांच्या टीमने तपासाची वेगाने चक्रे फिरवली.पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे आणि पोलीस हवालदार टाकरस व गुंडरे तसेच क्षीरसागर यांनी पोलीस पाटील तसेच सरपंच व तांत्रिक पथकाची मदत घेतली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे पसार झालेल्या आरोपीला अवघ्या 5 तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश मिळालेअसल्याचे सांगण्यात आले आहे.


