शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 13/5/2026

तामसा येथे शेतीमालाची लाखोंची खरेदी कच्च्या पावती शेतकरी

 लुटीचा 'टोकन' अन् 'डिस्काउंट' पॅटर्न नेमका काय? 


तामसा -(प्रतिनिधी हदगाव भगवान कदम ) 

हदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी नागवला तरी चालेल, पण व्यापारी जोपासला पाहिजे. या भूमिकेमुळे सध्या शेतकऱ्यांची पद्धतशीर लूट सुरू आहे. येथील व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानावर हळदीची आवक खेचण्यासाठी चक्क वाहन चालकांनाच  'टोकन' देण्याचा व विक्री पावतीवर 'डिस्काउंट' हा नवा फंडा वापरुन शेतकरी लुटीचा नवीन पॅटर्न सुरू केला आहे. बाजार समितीने देखील या कथीत प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत गांधारीची भूमिका घेतल्याने हा मिलीभगतचाच प्रकार असल्याचे स्पष्ट आहे. लाखो रुपयांच्या हळदीची खरेदी कच्च्या पावत्यांवर करुन  शासनाचा लाखो रुपयांचा 'कर' बुडवला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

       अलीकडच्या काळात अगदी नावारूपाला आलेल्या तामसा येथील हळद मार्केटमध्ये सध्या ​हळद विक्रीसाठी ईतर तालुक्यातून हळद उत्पादक शेतकरी हळद विकण्यासाठी येत आहेत. हळद विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना विशिष्ट व्यापाऱ्यांकडेच नेण्यासाठी चालकांना टोकन देऊन 80 ते 100 रुपये प्रति क्विंटल दराप्रमाणे टोकन 'फिक्स' केले जात आहे. जादा दराचे किंवा सोयीचे आमिष दाखवून शेतकऱ्याचा माल आपल्या काट्यावर वजन करुन उतरवून घेतला जातो. काट्यामध्ये फेरफार करणे किंवा माती-कचऱ्याच्या नावाखाली  हमाली, भावफरक करून शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पाडली जात आहे. ​शासकीय नियमांनुसार शेती मालाची खरेदी बाजार समितीने पुरविलेल्या पक्क्या पावतीवरच करणे बंधनकारक असताना, व्यापारी सर्रासपणे कच्च्या चिठ्ठ्यांवर लाखो रुपयांची खरेदी-विक्री करतांना दिसतात. यामुळे ​बाजार समिती आणि शासनाचा लाखो रुपयांचा 'कर' बुडवला जात आहे. कच्च्या पावतीमुळे शेतकऱ्याकडे व्यवहाराचा कोणताही कायदेशीर पुरावा राहत नाही. भविष्यात पैशांची अडवणूक किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास शेतकऱ्याने दाद कोणाकडे मागावी, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची असुरक्षितता वाढली आहे. ​या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या बाजार समितीचे अधिकारी मात्र डोळे झाकून 'गांधारी' भूमिका घेत आहेत. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे बाजार समितीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यात व्यापाऱ्यांचे आणि बाजार समिती प्रशासनाचे 'साटेलोटे' असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर 'कर'चोरी आणि लूट होणे शक्य नसल्याची चर्चा सुरू आहे.

----------- चौकट ---------- 

​शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणताना वाहनधारकांना भाडेही देतो. व्यापारी वाहनचालकांना टोकन देऊन पैसे देतात. डिस्काउंटच्या नावाखाली दिशाभूल करुन हमाली घेतात.पक्क्या पावत्या मिळत नाहीत आणि विचारणा केल्यास फिरवाफिरावीची उत्तरे देतात. शेतकऱ्यांसह शासनाला बुडवणाऱ्या प्रकाराकडे जिल्हा उपनिबंधक आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top