हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 12/5/2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आप्पाचीवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.
हिंदुसम्राट प्रतिनिधी - उत्तम हेलाटे आप्पाचीवाडी.
शाहू तरुण मंडळ, शाहूनगर आप्पाचीवाडी यांच्या वतीने १४ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी किल्ले भुदरगड येथून शिवशंभू ज्योत आगमन होणार असून तिचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन होणार आहे.
सकाळी ११ वाजता अथायु युरोकेअर हॉस्पिटल, निपाणी यांच्या सौजन्याने भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर तसेच मूत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून देवा आखाडा व अब्दुल लाट यांच्या वतीने थरारक मर्दानी खेळ, लाठी-काठी व दांडपट्टा प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. रात्री ऐतिहासिक “राजा शिवाजी” चित्रपटाचे भव्य मोफत स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
“३२० लढाया जिंकणारे, १३ भाषांचे ज्ञाते – आमचे शंभूराजे” य भगव्या वातावरणात साजरा करण्यात येणार असून समस्त शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक शाहू तरुण मंडळ, शाहूनगर आप्पाचीवाडी यांनी केले आहे.



