हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 18/8/2026
उरण मोरा येथील "चंद्राचा पृष्ठभाग" रस्ता - मुख्य रस्त्याची दुरावस्था, प्रशासनाने कधी डोळे उघडणार?
खड्डेच खड्डे... आणि खड्ड्यातच प्रशासन!
उरण पत्रकार / पूजा चव्हाण
*उरण / मोरा *
उरण मोरा येथील मुख्य रस्त्याची अवस्था पाहून नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळा आला की हा रस्ता रस्ता न राहता "चंद्रावरचा पृष्ठभाग" बनतो. मोठे मोठे खड्डे, पाणी आणि चिखलामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
हा मोरा गावाचा एकमेव मुख्य रस्ता आहे. शाळा, बाजारपेठ, JNPA आणि उरणला जोडणारा हा मार्ग असल्याने दिवसभर हजारो नागरिक, विद्यार्थी आणि कामगार याच रस्त्याने ये-जा करतात. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्डा आहे की रस्ता हेच कळत नाही.
*नागरिकांचा त्रास आणि कॉमेडी डायलॉग*
स्थानिक नागरिक म्हणतात, _"इथे गाडी चालवायला ड्रायव्हिंग लायसन्सपेक्षा सर्कसचे ट्रेनिंग लागते."_
दुसरे एकजण हसत म्हणाले, _"सरकारने आम्हाला फ्री फिशिंग स्पॉट दिले आहेत. प्रत्येक खड्ड्यात मासे पकडता येतील."_
तर एक आजी म्हणाल्या, _"बाबा, हा रस्ता नाही, हा आमच्या पाठीचा व्यायाम आहे. रोज 10 वेळा उड्या मारल्या जातात."_
रस्त्याच्या कडेला कचरा, पत्रे आणि बांधकामाचे साहित्य पडले असल्याने अरुंद झालेला रस्ता आणखी धोकादायक झाला आहे. दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत.
*प्रशासनाला जाब*
नागरिकांचा सवाल आहे की, कर भरताना आम्ही कधीच चुक करत नाही, मग रस्ते दुरुस्त करायला प्रशासनाला एवढा उशीर का?
_"निवडणुकीच्या वेळी फोटो काढायला येतात, भाषणं देतात. मग आता हा रस्ता दिसत नाही का?"_ असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.
पावसाळा संपण्याआधी तरी या मुख्य रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अन्यथा मोठा अपघात घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.




