हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 25/6/2026
उरणमध्ये 28 जून रोजी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान’; 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ‘दोन थेंब जीवनाचे’.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, दि. 25 जून 2026 (प्रतिनिधी)*
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या वतीने रविवार, 28 जून 2026 रोजी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान 2026’ राबवण्यात येणार आहे. या अभियानात 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय उरण तसेच तालुक्यातील सर्व पोलिओ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबवली जाणार आहे.
आरोग्य विभागाने सर्व पालक व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या घरातील तसेच शेजारच्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब आवर्जून पाजावेत. यापूर्वी पोलिओ लस घेतली असली तरीही पुन्हा लस देणे आवश्यक आहे, कारण ‘दोन थेंब जीवनाचे’ हे प्रत्येक बालकासाठी गरजेचे आहेत. पोलिओमुक्त भारत घडवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले आहे.
भारत पोलिओमुक्त झाला असला तरी शेजारील देशांमध्ये पोलिओचे विषाणू अजूनही आहेत. त्यामुळे धोका पूर्णपणे टळलेला नाही. एकही बालक लसीपासून वंचित राहू नये यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘पोलिओमुक्त भारत - सुरक्षित भविष्याची हमी’ आणि ‘पोलिओमुक्त भारत आपले लक्ष्य’ या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे. “दोन थेंब जीवनाचे - प्रत्येक बालकासाठी! पोलिओमुक्त भारतासाठी चला हातभार लावूया!” असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आपल्या बालकाच्या उज्ज्वल व निरोगी भविष्यासाठी 28 जून रोजी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा ग्रामीण रुग्णालय उरण येथे संपर्क साधावा, असे वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय उरण यांनी कळवले आहे.



