हिंदुसम्राट बातम्या / नवी मुंबई
*खालापूरच्या दुर्गम वाड्यांमध्ये मोफत आरोग्य शिबिर; ८२ आदिवासी बांधवांची तपासणी*
उरण प्रतिनिधी / पूजा चव्हाण
*खालापूर, दि. ३ :* खालापूर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य सुविधांपासून वंचित नागरिकांसाठी वनवासी कल्याण आश्रम उरण व खालापूर, डिवाइन फाउंडेशन नवी मुंबई आणि एव्हलीन हेल्थकेअर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार ३ मे २०२६ रोजी वशिवली वाडी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिराचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एकूण ८२ रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच सिकलसेल ऍनिमियाचे निदान करण्यात आले. ग्रामीण भागात सहसा न मिळणाऱ्या महागड्या तपासण्या मोफत मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
डी. वाय. पाटील हॉस्पिटल समूहातील तज्ज्ञ डॉ. सौरव जयस्वाल, अमीर मोहम्मद, काजळ साळुंखे, निमिषा चौधरी, जिगर मिस्त्री आणि डॅनियल कोकम यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य सल्ला दिला. सिकलसेल ऍनिमियाच्या तपासण्या लॅब टेक्निशियन नरेश जगदाळे व सुमित जगदाळे यांनी केल्या. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे अश्विनी बोडके व अनिकेत जगताप यांच्या सहकार्याने नेत्र तपासण्या झाल्या, तर मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी डॉ. हळदीपुरकर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तपासणीनंतर पनवेल व उरण येथील फार्मसिस्ट मनोज ठाकूर व हरीश जगदाळे यांच्या सहकार्याने आवश्यक औषधे मोफत वाटण्यात आली.
या शिबिराला खालापूर पंचायत समिती सदस्य महादेव गाढवे यांनीही भेट दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डिवाइन फाउंडेशनचे हरीश जगदाळे, डी. एच. सुब्रमण्यम, एव्हलीन हेल्थकेअरचे संचालक सुमित जगदाळे यांचे मोलाचे योगदान लाभले. वनवासी कल्याण आश्रमच्या जयश्री वाघमारे, जयश्री घोडविंडे, वर्षा अधिकारी व ओम गोंधळी यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. आश्रमाचे अध्यक्ष मनोज जगन्नाथ ठाकूर यांनी सर्व संस्था, डॉक्टर, कर्मचारी व स्वयंसेवकांचे आभार मानले. यावेळी वाडीवरील १५ ते १६ वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणाबाबत माहिती देऊन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच २४ मे २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या डी-लिस्टिंग मोर्च्यात सामील होण्याचे आवाहनही जनजाती बांधवांना करण्यात आले.




