शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 20/5/2026

 तिसरी मुंबई विरोधात लढा तीव्र करणार : माजी न्यायमूर्ती कोळसेपाटील यांचा शेतकऱ्यांना शब्द, ७ जूनला मेळाव्यातून एल्गार.



*पत्रकार (पूजा चव्हाण ) :

२५ हजार शेतकऱ्यांनी हरकती नोंदवूनही त्याची दखल न घेता १२४ गावांवर तिसरी मुंबई प्रकल्प लादणाऱ्या राज्य सरकारच्या दडपशाही विरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी संघर्ष समिती रायगडच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या लढ्यात सक्रिय सहभागी होण्याची विनंती करण्यासाठी समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांची महाबळेश्वर येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले. त्यावेळी न्यायमूर्ती कोळसेपाटील यांनी “सरकारला तिसरी मुंबईचा प्रकल्प आमच्या मढ्यावरच उभारावा लागेल” अशा शब्दांत आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. तसेच सेझ विरोधातील आंदोलन रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिंकले, त्याच पद्धतीने हे आंदोलनही यशस्वी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. देशातील कारभार सध्या आरएसएसच्या कलाने सुरू असून त्यांना केवळ जनतेला दोन वेळचे जेवण देऊन असेच तडफडवायचे आहे, असा गंभीर आरोपही यावेळी न्यायमूर्तींनी केला.


उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांतील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी घेऊन त्यावर तिसरी मुंबई नामक मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट राबविण्याचे सरकारने ठरवले आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना विचारात न घेता सरकारने हा प्रकल्प रेटून नेण्यासाठी अध्यादेशही काढला आहे. त्यानिमित्ताने साडेबावीस टक्क्यांची फसवी योजना शेतकऱ्यांपुढे गाजर म्हणून ठेवण्यात आली आहे. अनेक वर्षे गावठाण विस्तार न झाल्याने गावठाणाबाहेर गावकऱ्यांनी नैसर्गिक वाढीपोटी कुटुंब कबिल्यासाठी घरे आणि व्यावसायिक आस्थापने बांधली आहेत. त्यांचे काय होणार याबाबत सरकारने कोणत्याही पातळीवर स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या घरांसाठी बिल्डरधार्जिणी क्लस्टर योजना राबविली जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. तसेच २०१३ चा भूसंपादन कायदा अस्तित्वात असतानाही सरकार केवळ शेतकऱ्यांना फसवण्यासाठीच साडेबावीस टक्क्यांची योजना पुढे करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंद्रशेखर ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार अजित पाटील, निलेश पाटील आणि अनंत पाटील यांनी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांची महाबळेश्वर येथे खास भेट घेऊन त्यांच्या कानावर आंदोलनाची रूपरेषा घातली. त्यावेळी न्यायमूर्तींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे समितीला आश्वासित केले असून येत्या ७ जून रोजी रविवारी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top