हिंदुसम्राट न्यूज
दिनांक 14/5/2026
धरण उशाशी, कोरड घशाशी : रानसईतील आदिवासी वाड्यांवर भीषण पाणीटंचाई; टँकरवरच मदार, कायमस्वरूपी तोडग्यासाठी आदिवासींचे प्रशासनाला साकडे.
पत्रकार / पूजा चव्हाण.
उरण, दि. 13 :- उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्या व चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील दोन आदिवासी वाड्यांवर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. या वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी पूर्णपणे तळ गाठला असून हफशीतील पाणीपातळीही खालावली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र टँकरचे पाणी अपुरे पडत असल्याने आदिवासी बांधवांना तासन्तास रांगेत उभे राहून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून पाण्यासाठी झगडणाऱ्या या बांधवांना कायमस्वरूपी पाणी द्या, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई व पुनाडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा खालावल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यातच रानसई धरणाच्या डोंगरकुशीत वसलेल्या रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाटी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी, खोंड्याची वाडी आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायणी व केळाचामाळ या आदिवासी वाड्यांवर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. विहिरी आटल्याने येथील रहिवाशांना पाण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागत आहे.
प्रशासनाने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी तो गरजेच्या तुलनेत अत्यंत अपुरा आहे. कुटुंबासाठी पाणी मिळवण्यातच पूर्ण दिवस खर्ची पडत असल्याने मजुरीसाठी बाहेर पडता येत नाही. परिणामी उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न आदिवासी कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, ज्या रानसई धरणाची निर्मिती रानसई ग्रामपंचायत हद्दीतच झाली, त्याच हद्दीतील आदिवासी बांधव आज थेंबाथेंबासाठी तडफडत आहेत. ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी विदारक अवस्था येथे पाहायला मिळते.
या आदिवासी वाड्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत तीन विहिरींची कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, निधीअभावी ठेकेदाराने ही कामे अर्धवट सोडली आहेत. दोन विहिरींचे बांधकाम झाले असले तरी उर्वरित कामे रखडली आहेत. तसेच चिरनेर केळाचामाळ वाडीसाठी हेटवणे पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची योजना मंजूर होऊन ठेकेदार नेमण्यात आला, मात्र तेही काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
*प्रशासनाची भूमिका*
याबाबत पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेच्या उपअभियंता रुपाली म्हात्रे म्हणाल्या, “आदिवासींची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ३१ एप्रिलपासून टँकरची व्यवस्था सुरू केली आहे. जलजीवन मिशनमधून तीन विहिरींचे प्रस्ताव करून दोन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. निधी न मिळाल्याने ठेकेदाराने एक विहीर व इतर कामे अर्धवट ठेवली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.”
*रहिवाशांची व्यथा*
“आम्हाला पाण्यासाठी रोज वणवण भटकावे लागते. पाण्यासाठी मजुरी सोडावी लागते. आम्हाला या पाणी प्रश्नातून कायमचे मुक्त करून हक्काचे पाणी द्या,” अशी आर्त हाक खैरकाटी येथील रहिवासी मोहन कातकरी यांनी दिली.
एकूणच, धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या उरण तालुक्यात धरणाच्या कुशीतील आदिवासींनाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी तीव्र झाली आहे.


