शीर्षक नाही

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक 12/5/226

पनवेलमध्ये पत्रकार उत्कर्ष समितीचा १० वा वर्धापन दिन दिमाखात; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव*  



*उरण वार्ताहर :- (संयोग चव्हाण )

 पत्रकारिता क्षेत्राला बळ देणाऱ्या व समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणाऱ्या पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांचा १० वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ सोमवार, दि. ११ मे रोजी पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.  


कार्यक्रमाची सुरुवात "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" या उक्तीप्रमाणे पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रीतम म्हात्रे, महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. स्मिता अजय पाटील, उपाध्यक्ष सौ. आरती पाटील, सचिव ॲड. एम. दिव्या लोकरे व इतर मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गणेश वंदनेने वातावरण भक्तिमय झाले. “जय जय महाराष्ट्र माझा…” या महाराष्ट्र गीताने संपूर्ण सभागृहात चैतन्य निर्माण झाले. गायक अलंकार भोईर व विश्वनाथ गायकवाड यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागृत झाली.  



यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत राम जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. समितीने त्यांच्या पत्नी सौ. निशा जाधव यांचा साडी-चोळी देऊन माहेरवाशिणीचा सन्मान केला. या कृतीतून समिती आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सदैव उभी असल्याचा संदेश दिला.  


कार्यक्रमात समितीच्या महिला व पुरुष सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. “पत्रकार उत्कर्ष समिती वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा स्मरणिका २०२६” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  


त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदर्श सेवाव्रती पुरस्कार आर्या अजय देशमुख व डॉ. दिपाली उमाळे, लोककला गौरव पुरस्कार दत्ता हरी भोईर व दिगंबर धर्मा कोळी, समाजरत्न पुरस्कार गजानन देशमुख, आदर्श पत्रकार पुरस्कार गणेश राऊत व राजन देसाई, आदर्श शिक्षक पुरस्कार ज्योती वाघ व सुनील दरवडा, साहित्यरत्न पुरस्कार वृषाली टाकले व सरोज अंदणकर, आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. नकुल महाराज भोईर व ह.भ.प. विक्रम महाराज थोरवे, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शंकर शिंदे, आदर्श संस्था पुरस्कार स्नेहज्योत संस्था (मुंबई) तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार विजयकुमार राठोड यांना प्रदान करण्यात आला.  


यासोबतच “पंचज्योती सन्मान” या विशेष राज्यस्तरीय पुरस्काराने पाच कर्तृत्ववान महिलांचा गौरव झाला. ॲड. अनिशा फणसळकर यांना “न्यायज्योत”, मीना घोडविंदे यांना “सेवाज्योत”, मोनिका शिंपी यांना “गिरीजन उद्धार ज्योत”, रेखा पाटील यांना “शृंगार ज्योत” आणि समता ठाकूर यांना “ज्ञानज्योत” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  


सोहळ्यास पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे व शिवसेना शिंदे गटाचे पनवेल तालुका अध्यक्ष परेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पत्रकार उत्कर्ष समितीच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला आज खरी गरज असल्याचे मत व्यक्त केले.  


कार्यक्रमाची रंगत लोककलावंत दत्ता हरी भोईर यांच्या “आई एकविरा सांस्कृतिक कलामंच”च्या कलाकारांनी कोळीगीते व बहारदार लावणी सादर करून वाढवली. त्यांच्या सादरीकरणाने सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.  


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अक्षय पाटील (पेण) व पंडित सर (उरण) यांनी अत्यंत प्रभावी शैलीत केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा ठरला.  


हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे सर्वेसर्वा अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या सर्व पदाधिकारी व पत्रकार बंधू-भगिनींनी मोलाचा सहभाग घेतला.  


एकूणच, पत्रकार उत्कर्ष समितीचा हा वर्धापन दिन केवळ पुरस्कार सोहळा न ठरता, प्रेरणा देणारा, समाजकार्याला चालना देणारा व सांस्कृतिक समृद्धीचा उत्सव ठरला. उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top