द्वितीय पुण्यस्मरणी स्व. प्रशांतभाऊ पाटील यांना जेएनपीटीत ‘भक्तीमय आदरांजली’, भक्तिगीतांनी भारावले वातावरण.

हिंदू सम्राट बातम्या
0

हिंदुसम्राट न्यूज 

दिनांक :- 20/6/2026

द्वितीय पुण्यस्मरणी स्व. प्रशांतभाऊ पाटील यांना जेएनपीटीत ‘भक्तीमय आदरांजली’, भक्तिगीतांनी भारावले वातावरण.









पत्रकार / पूजा चव्हाण 

उरण, दि. 20 जून 2026 : उरणच्या जनमानसावर अधिराज्य गाजवणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस स्व. प्रशांतभाऊ बाळकृष्ण पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि. 20 जून 2026 रोजी जेएनपीटी टाऊनशिप येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये ‘भक्तीमय आदरांजली’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सकाळी 9.30 ते 11.00 या वेळेत हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला.


जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथॉरिटीचे मा. बोर्ड मेंबर दिनेश पाटील यांनी निमंत्रक म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशांतभाऊंवर निस्सीम प्रेम करणारे शेकडो मित्र उपस्थित होते.


20 जून 2024 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने स्व. प्रशांतभाऊ पाटील यांची अकाली एक्झिट झाली. भेंडखळ या मूळ गावचे असलेले प्रशांतभाऊ महाविद्यालयीन जीवनापासूनच अन्यायाविरुद्ध लढणारे नेतृत्व म्हणून पुढे आले. शिवसेनेत तालुका प्रमुखापासून जिल्हाप्रमुखपर्यंत जबाबदारी सांभाळत प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले. पुढे शरद पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि प्रदेश सरचिटणीस पदावरून जनसेवेचा वसा कायम ठेवला.


कार्यक्रमाचा प्रारंभ स्व. प्रशांतभाऊंच्या तसबिरीला पुष्पांजली वाहून झाला. त्यानंतर सादर झालेल्या भक्तिगीतांनी व अभंगांनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. “भाऊंनी पैसा नाही, तर माणसं कमावली” ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.


मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी सांगितले, “प्रशांतभाऊ गेले कुठे? ते तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात धडधडत आहेत. त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी आदरांजली ठरेल.” साहेबांचे शरीर जरी आपल्यात नसले तरी त्यांचा विचार आणि संस्कारांचा वारसा आजही जिवंत आहे, यावर सर्वांनीच भर दिला.


या भावनिक सोहळ्याला उपस्थित राहून स्व. प्रशांतभाऊंबद्दल आपुलकी व्यक्त करणाऱ्या सर्व आप्तेष्ट, हितचिंतक आणि मित्रपरिवाराचे निमंत्रक दिनेश पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


_“साहेब, तुम्ही होता, आहात आणि कायम राहाल...”_ या घोषणेने आणि भारावलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. “प्रशांतभाऊंची पोकळी कधीच भरून निघणार नाही,” अशी खंत व्यक्त करत उपस्थितांनी जड अंतःकरणाने निरोप घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Made by Omkar Patil developer

To Top