हिंदुसम्राट न्यूज
दिनांक :- 9/7/2026
"कुंभार्लीच्या शूर सुपुत्राचा 'सेवा' प्रवास पूर्ण! लान्स नायक जितेश कोलगे 17 वर्षांच्या सैन्यसेवेनंतर सन्मानाने निवृत्त, गावात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत"
चिपळूण, 6 जून 2026 (संतोष कोलगे) :
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील लान्स नायक जितेश हेमंत कोलगे हे सलग 17 वर्षे मातृभूमीची निस्वार्थ सेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त झाले. देशाच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आणि रणरणत्या उन्हात तैनात राहून देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या या वीर जवानाचे कुंभार्ली नगरीत आगमन होताच गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात भव्य मिरवणूक काढून अभूतपूर्व स्वागत केले.
सैन्यदलात भरती झाल्यापासून लान्स नायक जितेश कोलगे यांनी संवेदनशील आणि दुर्गम भागात आपली कर्तव्ये बजावली. 17 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत देशाचे रक्षण केले. सैन्यातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांमुळे त्यांनी सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. सेवानिवृत्तीनंतर गावात परतलेल्या या शूरवीराला पाहण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी कुंभार्ली गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
गावात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनंतर आयोजित सत्कार समारंभात गावचे सरपंच रवींद्र सकपाळ, उपसरपंच संदीप भाई कोलगे, माजी उपसरपंच अजिंक्य कोलगे, माजी उपसरपंच दिनेश लब्दे, बीजेपीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष वसंत ताम्हणकर, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे उपाध्यक्ष संतोष कोलगे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रसाद कोलगे, बाबा कोलगे, नरेश भाई कोलगे, राजाभाऊ नारकर, सत्यवान भाऊ कोलगे, बाळू जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लान्स नायक जितेश कोलगे यांच्या देशसेवेचा गौरव करत त्यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. "जितेशने कुंभार्ली गावाचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. त्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे," अशा भावना सरपंच रवींद्र सकपाळ यांनी व्यक्त केल्या.
या सोहळ्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गावातील माता-भगिनींनी औक्षण करून वीर जवानाचे स्वागत केले. देशसेवेसाठी आपले तारुण्य वेचणाऱ्या जितेश कोलगे यांच्या कुटुंबीयांचाही यावेळी ग्रामस्थांनी विशेष सन्मान केला. सत्काराला उत्तर देताना लान्स नायक जितेश कोलगे भावुक झाले. "सैन्यातील 17 वर्षे ही माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाची वर्षे आहेत. देशसेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य. गावकऱ्यांनी दिलेले हे प्रेम आणि सन्मान मी कधीच विसरणार नाही. आता निवृत्तीनंतरही समाजसेवेतून गावाच्या विकासासाठी काम करेन," असा शब्द त्यांनी यावेळी दिला. कुंभार्लीसारख्या छोट्याशा गावातून सैन्यात जाऊन देशसेवा करणाऱ्या जितेश कोलगे यांचा आदर्श नव्या पिढीतील तरुणांसमोर नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल पत्रकार उत्कर्ष समितीने त्यांना निवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत


